पॅरिस : जे लोक काही बाबींचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी हिंदूंचे धर्मग्रंथ, वेद-उपनिषद वाचले असून भाजप जे काही करतेय, ते हिंदूवादी नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली. पॅरिसमध्ये त्यांनी ‘इंडिया-भारत’ नावावरून सुरू असलेला वाद, हिंदुत्व या मुद्यावर मते मांडली. ते म्हणाले की, ‘‘भारताच्या राज्यघटनेत इंडिया म्हणजे ‘दॅट इज भारत’ म्हणजे राज्याचा संघ म्हणून म्हटले आहे. विविध राज्यांचा बनून ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ बनला आहे. या राज्यातील सर्व जनतेचा आवाज ऐकला जातो. कोणाचाही आवाज दाबला जात नाही किंवा त्यांना घाबरवले जात नाही.’’
गांधी म्हणाले की, ‘‘मी गीता वाचली असून उपनिषदांचा अभ्यास केला आहे. हिंदूंची अन्य पुस्तके वाचली आहेत. मात्र, भाजप जे काही करते, त्यातील एकही बाब हिंदुत्ववादी नाही. ‘इंडिया’ म्हणजेच भारतीय राज्यांचा संघ आहे. जे लोक काही बाबींचा नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राहुल म्हणाले की, ‘इंडिया दॅट इज भारत’ हा सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करते. विकेंद्रीकृत व लोकशाही भारत हा राजकीयदृष्ट्या पुढे जात आहे.