पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतात आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन संयुक्त तपास ठाण्यामध्ये घुसवून घडविलेल्या स्फोटात १२ सुरक्षा रक्षक आणि सहा दहशतवादी ठार झाले, असे बुधवारी पाक लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.
बन्नू जिल्ह्यातील मालीखेल येथे असलेल्या तपासणी ठाण्यांमध्ये मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासणी ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी आत्मघातकी हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात भिंतीचा काही भाग कोसळला आणि १२ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात सहा दहशतवादी ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता या परिसरामध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.