मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून कच्चे तेल विकत घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला या तेलाचे पैसे भारत रुपयांमध्ये देत होता. तेव्हा ते रशियाने स्वीकारले. आता रशियाने आडीबाजी करायला सुरुवात केली असून तेलाचे पैसे चीनचे चलन युआनमध्ये देण्यासाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे तेल टँकर्सच्या देयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सरकारी रिफायनर्सना रशियन तेल खरेदीवर पैसे देण्यासाठी चिनी चलन वापरण्याची परवानगी देऊ इच्छित नाही, असे सांगितले आहे. एका अहवालात आलेल्या या माहितीमुळे भारत-रशिया वाद पेटण्याची शक्यता आहे.
युक्रेन युद्धामुळे काही पाश्चात्त्य देशांनी रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदी घातली आहे. तेव्हापासून सवलतीच्या दराचा फायदा घेत भारत हा रशियन तेलाचा मोठा आयातदार बनला आहे. अमेरिका आणि युरोपियन महासंघाने रशियन तेलाची किंमत निश्चित केल्यावर हा मुद्दा समोर आला. दोघांनी रशियन तेलावर प्रति बॅरल ६० डॉलर्स किंमत मर्यादा निश्चित केली होती. या मर्यादेमुळे रिफायनर्सना रशियासोबत त्यांचा व्यवसाय सेटल करण्यात अडचणी येत आहेत. ही मर्यादा लक्षात घेता, खरेदीदार यूएईच्या दिरहमसारख्या पर्यायांकडे वळले आहेत. भारत सरकारच्या युआनमधील नकारामुळे किमान सात तेल शिपमेंटचे पैसे दिले गेले नाहीत. वाद असूनही, रोझनेफ्टसारख्या काही रशियन कंपन्या भारतीय रिफायनर्सना तेल पुरवत आहेत.
यापूर्वी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी काही रशियन तेलाचे पैसे द्यायला चिनी चलन वापरण्यास सुरुवात केली, तर बहुतांश तेल खरेदीचे पैसे डॉलर आणि दिरहममध्येच केले जात आहे. अर्थखात्याच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भारत सरकारने तेलाचे पैसे द्यायला युआन चलन वापरण्यात अस्वस्थता व्यक्त केली आहे. तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, किमान सात शिपमेंटचे पैसे अद्याप प्रलंबित आहेत.
सरकारने सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांना युआन वापरणे थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भारत हे मान्य करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, युआन वापरायला बंदी नसली तरीही सरकार अशा व्यापाराला प्रोत्साहन देत नाही किंवा सुविधा देत नाही. भारतीय तेल कंपन्यांनी खरेदी केलेले बहुतेक तेल रशियन व्यापाऱ्यांकडून येते, काही रशियन कंपन्यांकडून थेट खरेदी केले जाते. व्यापारी दिरहममध्ये व्यवहार करू इच्छितात, परंतु रशियन कंपन्या युआनचा आग्रह धरत आहेत.