लंडन : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आदी विकार सामान्य होत चालले असून त्यात बळी पडणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. वयाच्या चाळिशी किंवा पन्नाशीनंतर नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असले तरी ते सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी केवळ एका रक्त चाचणीद्वारे शरीरातील वेगवेगळे अवयव किती वेगाने वृद्ध होऊ लागले आहेत, हे आता तपासता येणार आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे हे संशोधन वेळीच रोगनिदान करून भविष्यातील धोके टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष नेचर या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
सध्या शहरांतच नव्हे तर लहान गावांमध्येही नागरिकांचे जीवनमान बदलत चालले आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सकस आहारापेक्षा फास्टफूडकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली याने परिस्थिती आणखी गंभीर बनवली आहे. अशा वेळी आपल्या शरीरातील बदल वेळीच लक्षात न आल्याचा फटका अनेकांना बसत आहे. कमी वयातील लोक हृदयविकाराला बळी पडत आहेत. वयाच्या चाळिशीनंतर अधूनमधून वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण वेळेचा, पैशाचा आणि जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक वेळा त्याची दखल घेत नाहीत. परिणामी अचानक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी आता केवळ एका रक्त चाचणीतून शरीरातील वेगवेगळे अवयव काय, वेगाने म्हातारे होत आहेत ते कळू शकते. त्यावरून पुढील धोका टाळणे शक्य होईल.
जन्माला आल्यापासून आपली वृद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते. आपले आरोग्य चांगले असेल तर वृद्धत्वाकडील प्रवास हळूहळू होत असतो. व्यक्तीचे आरोग्य चांगले नसेल तर तिचा वृद्ध होण्याचा वेगही सरासरीपेक्षा जास्त असतो. त्याला आपण एखादी व्यक्ती तिच्या खऱ्या वयापेक्षा अधिक मोठी दिसत असल्याचे म्हणतो. शास्त्रज्ञांच्या मते शरीरातील विविध अवयवांचा वृद्ध होण्याचा वेग एकसारखा नसतो. काही अवयव अन्य अवयवांपेक्षा वेगाने वृद्ध होत असतात. तो वेग मोजण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. त्यासाठीचे बायोमार्कर शोधून काढले आहेत. त्यांनी रक्तात असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणावरून अवयवांच्या वृद्ध होण्याचा वेग शोधून काढला आहे. प्रत्येक अवयवाशी संबंधित प्रथिने वेगळी आहेत. रक्तात विशिष्ट प्रथिनांचे काय प्रमाण आहे यावरून कोणता अवयव वेगाने वृद्ध होत चालला आहे, ते समजू शकते. या प्रक्रियेत अचूकता वाढवण्यासाठी संशोधकांनी अनेक रुग्णांचा डेटा वापरून अंदाज बांधण्यासाठी मशीन-लर्निंग अल्गोरिदम विकसित केले.
क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील वय-संबंधित आरोग्य आणि रोगांचे तज्ज्ञ प्रोफेसर जेम्स टिमन्स हे देखील जैविक वयाच्या रक्त मार्करचा अभ्यास करत आहेत. त्यांचे कार्य प्रथिनांऐवजी जनक बदलांवर केंद्रित आहे. त्यांच्या मते अधिक लोकांमध्ये, विशेषत: विविध वांशिक पार्श्वभूमीतील तरुणांमध्ये प्रमाणीकरण आवश्यक आहे.
पन्नाशीनंतर अवयव वृद्ध होण्याचा धोका जास्त
स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधनावरून असे लक्षात आले की, वयाच्या पन्नाशीनंतर १८.४ टक्के प्रकरणांत व्यक्तीचा किमान एखादा अवयव सरासरीपेक्षा अधिक वेगाने वृद्ध होताना दिसतो. या व्यक्तींना पुढील १५ वर्षांत काही आजार आणि मृत्यूचा उच्च धोका असतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक म्हणतात की, ते हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसह शरीराच्या ११ प्रमुख अवयवांचे निरीक्षण करू शकतात. त्यातून भविष्यातील धोके टाळण्यास मदत होणार आहे.