जगाला फिट राहण्याचा सल्ला देणाऱ्या Instagram स्टारचा अचानक मृत्यू, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर मिला सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. चाहत्यांना ती नेहमी फिट राहण्याचा सल्ला देत असे.
जगाला फिट राहण्याचा सल्ला देणाऱ्या Instagram स्टारचा अचानक मृत्यू, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

संपूर्ण जगाला फिट राहण्याचा सल्ला देणारी ब्राझीलची प्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टार मिला डी जीजस हिचा वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षीच मृत्यू झाला. 12 जानेवारी रोजी अचानक मिलाच्या मृत्यूचे वृत्त आल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर मिला सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. चाहत्यांना ती नेहमी फिट राहण्याचा सल्ला देत असे.

मिलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसले तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. तथापि, ऑक्टोबरमध्ये तिने सोरायसिस या आजाराबाबत खुलासा केला होता. तीन महिन्यांपासून या आजाराने त्रस्त असल्याचे तिने सांगितलं होतं. त्यामुळे शरीराचे 80 टक्के भाग खराब झाल्याचही तिने सांगितलं होतं. मिलाच्या मृत्यूच्या वृत्ताला तिच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. तिची मुलगी अॅना क्लारा हिने इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. 'आमची आई आता राहिली नाही. ही दु:खद बातमी मी तुम्हासर्वांसोबत शेअर करत आहे. तुम्ही व्यक्त केलेला शोक आणि सर्व प्रार्थनांचा आम्ही आदर करतो. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. धन्यवाद.' असे अॅनाने लिहिले.

इंस्टाग्रामवर 60 हजारांहून अधिक लोक मिला डी जीजसला फॉलो करतात. तिचा जन्म ब्राझीलमध्ये झाला होता, परंतु ती बोस्टनमध्ये राहत होती. अवघ्या चार महिन्यांपूर्वी, तिने जॉर्ज कोव्हॅझिकशी दुसरे लग्न केले. पहिल्या लग्नापासून तिला चार मुले आहेत.

अशी झाली होती प्रसिद्ध -

5 ऑक्टोबर 2017 रोजी जीससची गॅस्ट्रिक बायपास सर्जरी झाली होती, त्यानंतर ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली होती. तिने सर्जरी आधीचे आणि नंतरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्याला ''सहा वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाने माझे आयुष्य खूप बदलले'' असं कॅप्शन होतं.

logo
marathi.freepressjournal.in