ब्रिटिश पेट्रोलियमकडून तांबड्या समुद्राचा वापर बंद - येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे निर्णय

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धाचे परिणाम आता जगाच्या अन्य प्रदेशातही पसरण्यास सुरुवात झाली आहे
ब्रिटिश पेट्रोलियमकडून तांबड्या समुद्राचा वापर बंद - येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे निर्णय
PM

लंडन : तांबड्या समुद्राच्या मुखाशी वसलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी हमासला पाठिंबा देऊन इस्रायलला जाणाऱ्या जहाजांवर हल्ले सुरू केल्यामुळे जगातील अनेक प्रमुख शिपिंग कंपन्यांनी सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्रातून जाणारा मार्ग वापरणे बंद केले आहे. जगातील प्रमुख खनिज तेल उत्पादक कंपनी ब्रिटिश पेट्रोलियमनेही (बीपी) मंगळवारी हा मार्ग वापरणे बंद करण्याची घोषणा केली. ही परिस्थिती आणखी काही दिवस सुरू राहिली तर जागतिक बाजारपेठेतील इंधनाच्या आणि अन्य जिन्नसांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, स्पेन आणि बहरीन या देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला आहे. या देशांच्या युद्धनौका संघर्षग्रस्त भागातून जाताना व्यापारी जहाजांची सोबत करणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धाचे परिणाम आता जगाच्या अन्य प्रदेशातही पसरण्यास सुरुवात झाली आहे. गाझा पट्टीतील हमास, लेबॅननमधील हिजबुल्ला आणि येमेनमधील हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. इराण आणि इस्रायलचे वैर आहे. इस्रायलने गाजा पट्टीतील हल्ले जसजसे तीव्र केले आहेत तसतसे हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रातून इस्रायलला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि रॉकेट्सद्वारे हल्ले सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात हुथी बंडखोरांनी अशा अनेक जहाजांना लक्ष्य बनवले आहे. त्यापैकी काही प्रकरणांत जहाजे इस्रायलला जात नसतानाही त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. या सर्व प्रकारांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक कंपन्यांनी सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता युरोप आणि मध्य-पूर्वेतील अनेक देशांना भारत, चीन आणि अन्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी अधिक लांबचा मार्ग वापरावा लागणार आहे. युरोपमधून आशियाच्या किनाऱ्यावर येण्यासाठी त्यांच्या जहाजांना आता भूमध्य समुद्र, सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्राऐवजी संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरात प्रवेश करावा लागणार आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होपला वळसा घालून येताना या जहाजांना किमान ३५०० सागरी मैलांचा जादा प्रवास करावा लागणार आहे. युरोपमधून भूमध्य समुद्र-सुएझ कालवा-तांबडा समुद्र आणि हिंदी महासागर असा प्रवास साधारण १० हजार सागरी मैलांचा आहे. त्यात आता आणखी ३५०० सागरी मैलांची वाढ होऊन तो प्रवास सुमारे १३,५०० सागरी मैलांचा होणार आहे. युरोपमधून तांबड्या समुद्रामार्गे प्रवास करून आशियात येण्यास जहाजांना साधारण २५ दिवस लागतात. आता आफ्रिकेला वळसा घालून येताना त्यात दहा दिवसांच्या प्रवासाची भर पडणार आहे. त्यासाठी अधिक इंधन खर्ची पडणार आहे. शिवाय, जहाजांना युद्धातील संभाव्य नुकसानापासून भरपाई देणाऱ्या विम्याचा दरही वाढला आहे. ही परिस्थिती आणखी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ सुरू राहिली तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, नैसर्गिक वायू, धान्य आदी पदार्थांच्या किमती बऱ्याच वाढण्याची शक्यता आहे.

अश्रू वाढणार

तांबडा समुद्र (रेड सी) आणि अरबी समुद्राला जोडणारी केवळ ३२ किमी रुंदीची चिंचोळी सामुद्रधुनी बाब-अल-मांडेब किंवा गेट ऑफ टियर्स म्हणून ओळखली जाते. नौकानयनासाठी हा मार्ग पूर्वीपासूनच धोकादायक आहे. तेथे अनेक जहाजे बुडत असल्याने त्याला जुन्या खलाशांनी अश्रूंचे द्वार असे नाव दिले होते. बाब-अल-मांडेबच्या उत्तरेला येमेनचा, तर दक्षिणेला जिबुती आणि इरिट्रियाचा किनारा आहे. सध्या येमेनमधील हुथी बंडखोर या सागरी मार्गावरील जहाजांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी पर्यायी मार्ग अनुसरला असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन आणि अन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in