गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

प्रसिद्ध व्हिडीओ गेम Call of Duty मालिकेचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा कॅलिफोर्नियामधील भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिसमधील एका महामार्गावर फेरारी 296 GTS कारने भीषण अपघातानंतर पेट घेतला. या अपघाताचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल
गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल
Published on

वॉशिंग्टन डीसी : प्रसिद्ध व्हिडीओ गेम Call of Duty मालिकेचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा कॅलिफोर्नियामधील भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते ५५ वर्षांचे होते. लॉस एंजेलिसमधील एका महामार्गावर फेरारी 296 GTS कारने भीषण अपघातानंतर पेट घेतला. या अपघाताचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, रविवारी लॉस एंजेलिसमधील एका महामार्गावर झॅम्पेला फेरारी 296 GTS या कारमधून प्रवास करत होते. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती. व्हायरल व्हिडीओमध्ये लाल रंगाची फेरारी कार बोगद्यातून बाहेर पडताच रस्ता सोडून उजव्या बाजूच्या काँक्रीटच्या भिंतीवर आदळते आणि काही क्षणांतच पेट घेते. Electronic Arts या कंपनीने झॅम्पेला यांच्या निधनाला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, Respawn Entertainment ही गेम कंपनी झॅम्पेला यांनीच सहस्थापित केली होती आणि ती Electronic Arts च्याच मालकीची आहे.

प्रवासी सीटवरील व्यक्ती थेट गाडीतून बाहेर, कारमधील दोघांचाही मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमधील प्रवासी सीटवरील व्यक्ती गाडीतून बाहेर फेकली गेली, तर चालक गाडीत अडकून पडला. अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते, झॅम्पेला की दुसरी व्यक्ती, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. Electronic Arts च्या प्रवक्त्याने BBC शी बोलताना सांगितले, “हा अपार दुःखद धक्का आहे. विन्स यांच्या कुटुंबीयांप्रती, त्यांच्या जवळच्या व्यक्तींप्रती आणि त्यांच्या कामामुळे प्रभावित झालेल्या सर्वांप्रती आमच्या मनापासून संवेदना आहेत.”

गेमिंग इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का

विन्स झॅम्पेला यांनी २००३ मध्ये जेसन वेस्ट आणि ग्रँट कॉलियर यांच्यासोबत Call of Duty या लोकप्रिय गेम मालिकेची निर्मिती केली होती. दुसऱ्या महायुद्धातील घटनांवर अंशतः आधारित असलेल्या या गेमच्या आतापर्यंत ५० कोटींपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे या गेमचा मालक असलेली मायक्रोसॉफ्टची Activision ही कंपनी जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या गेमिंग कंपन्यांपैकी एक ठरली. या फ्रँचायझीवर आधारित लाइव्ह-ॲक्शन चित्रपटही लवकरच येणार आहे. Call of Duty हीच झॅम्पेला यांची एकमेव यशस्वी निर्मिती नव्हती. Medal of Honor, Titanfall आणि Apex Legends यांसारख्या लोकप्रिय गेम्सच्या निर्मितीतही त्यांचा मोठा वाटा होता.

२०१० मध्ये झॅम्पेला आणि जेसन वेस्ट यांना Activision या Call of Duty गेमच्या प्रकाशक कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर दोघांचा कंपनीसोबत दीर्घ कायदेशीर वाद झाला, जो अखेर २०१२ मध्ये न्यायालयाबाहेर मिटवण्यात आला. Electronic Arts मध्ये काम करत असताना झॅम्पेला Battlefield 6 या गेमवर काम करत होते, जो Call of Duty चा थेट प्रतिस्पर्धी मानला जातो. Call of Duty विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनी Infinity Ward नेही शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “विन्स झॅम्पेला आमच्या इतिहासाचा कायमस्वरूपी भाग राहतील.” कंपनीने X (पूर्वीचे ट्विटर) वर दिलेल्या निवेदनात म्हटले, “कालातीत आणि संस्मरणीय मनोरंजन निर्माण करण्याचा तुमचा वारसा अमूल्य आहे.”

विन्स झॅम्पेला यांचा अचानक झालेला मृत्यू जगभरातील गेमिंग इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in