

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानातील युद्ध आपणच थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला होता. मात्र, आता चीननेही भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा चीनचा दावा हास्यास्पद आहे, कारण ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने चिनी शस्त्रे वापरली होती. त्यावेळी चीनने त्याचा मित्र पाकिस्तानला सर्वतोपरी मदत केल्याचे वृत्तही आले होते. अशा परिस्थितीत चीन आता "शांतता प्रस्थापित करणारा" असल्याचे भासवत आहे हे आश्चर्यकारक आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांचा अनेकदा दावा
आतापर्यंत फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारत-पाकिस्तान वाद सोडवण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ते विविध व्यासपीठांवरून वारंवार मध्यस्थीबद्दल बोलले होते. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीनंतर त्यांनी हा मुद्दा पुन्हा सांगितला. याचे खोटे श्रेय घेण्याच्या शर्यतीत चीनही सामील झाला आहे.
युद्धबंदीबाबत भारताने आतापर्यंत कोणत्याही मध्यस्थीचा इन्कार केला आहे. भारत सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, मे महिन्यात ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या पुढाकाराने युद्धबंदीवर सहमती झाली होती आणि त्यानंतर हल्ला थांबवण्यात आला होता. भारताने सातत्याने असे म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे द्विपक्षीय आहेत आणि अमेरिका किंवा चीनसारख्या कोणत्याही तिसऱ्या देशाची त्यात कोणतीही भूमिका नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा चीनचा दावाही हास्यास्पद आहे, कारण संपूर्ण जगाला माहीत आहे की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने चिनी शस्त्रे वापरली होती. त्यावेळी चीनने त्याचा मित्र पाकिस्तानला सर्वतोपरी मदत केल्याचे वृत्तदेखील आले होते. अशा परिस्थितीत चीन आता "शांतता प्रस्थापित करणारा" असल्याचे भासवत आहे हे आश्चर्यकारक आहे. दरम्यान, चीनने केलेल्या दाव्यावर देशवासीयांना सुस्पष्टता हवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ही देशाच्या सुरक्षेची खिल्ली उडविण्याचा प्रकार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे मौन सोडावे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
'शांतता दूत'
बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील एका परिसंवादात परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, यावर्षी जगात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक सीमापार संघर्ष आणि स्थानिक युद्धे झालीत. भू-राजकीय अशांतता वाढत आहे. चीनने चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुढे म्हटले की, चीनच्या हॉटस्पॉट समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनानुसार, आम्ही उत्तर म्यानमार, इराण अणुप्रश्न, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील मुद्दे आणि कंबोडिया आणि थायलंडमधील अलिकडच्या संघर्षात मध्यस्थी केली आहे.