

टोकियो : चीनच्या लढाऊ विमानांनी जपानी लढाऊ विमानाचे रडार ‘लॉक’ केल्याचा दावा जपानने केला आहे. या प्रकरणामुळे जपान व चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जपानचे संरक्षणमंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी सांगितले की, जपानने या घटनेबाबत अधिकृत निषेध नोंदवला आहे. हा ‘अत्यंत खेदजनक’ आणि ‘धोकादायक’ प्रकार आहे. आम्ही चीनकडे याबाबत कडक निषेध नोंदवून कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनच्या ‘जे-१५’ या लढाऊ विमानाने चीनच्या ‘लियाओनिंग’ या विमानवाहू जहाजावरून शनिवारी ओकिनावाच्या दक्षिणेकडील बेटाजवळ उड्डाण केले. जपानी ‘एफ-१५’ विमानांवर दोन वेळा काही ‘अंतराने’ रडार लॉक केल्याचे बोलले जात आहे. दोन्ही वेळा एकच चिनी ‘जे-१५‘ विमान सहभागी होते की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
जपानी लढाऊ विमाने प्रशांत क्षेत्र भागात चिनी विमानांच्या टेकऑफ-लँडिंग सरावाच्या हालचालींचा पाठलाग करत होती. ते सुरक्षित अंतर राखून पाठलाग करत होते आणि कोणतीही उचकावणारी कृती केली नव्हती, असे ‘क्योदो न्यूज’ने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. जपानी हवाई हद्दीचे उल्लंघन झाले नव्हते आणि कोणतीही दुखापत किंवा हानी झाल्याची नोंद नाही.
चिनी नौदलाचे प्रवक्ते सिनिअर कर्नल वांग श्वेमेंग यांनी मियाको बेटाजवळील चीनच्या उड्डाण प्रशिक्षणाचे समर्थन केले. चीनने आधीच या सरावाची माहिती दिली होती आणि जपानी विमानांनी ‘टेहळणी’ केली, असा आरोप त्यांनी केला. जपानने बदनामी आणि चुकीचे आरोप करणे तत्काळ थांबवावे आणि आघाडीवरील कारवायांवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी आम्ही त्यांना विनंती करतो, असे ते म्हणाले.