
बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिकेने लादलेल्या १०४ टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के टॅरिफ लादला असून हे दर गुरुवारपासून लागू होतील, असे चीनने जाहीर केले आहे. यापूर्वी चीनने अमेरिकन वस्तूंवर ३४% कर लादला होता, जो आणखी ५०% ने वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, युरोपियन युनियननेही बुधवारी अनेक अमेरिकन उत्पादनांवर २५ टक्के पर्यंत कर लादण्यास मान्यता दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन राष्ट्रांवरही कर लादल्याने त्यांनीही अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.
एका अहवालानुसार, चीन व युरोपियन समुदायाने अमेरिकेवर कर लादल्याने सोयाबीन, मांस, अंडी, बदाम, लोखंड, स्टील, कापड, तंबाखू आणि आईस्क्रीमसह अनेक उत्पादने महागणार आहेत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने १२ अमेरिकन कंपन्यांना निर्यात नियंत्रण यादीत टाकले आहे. यापूर्वी, या कंपन्यांच्या यादीत ६ कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, अमेरिकेने चीनवर लावलेला १०४% कर बुधवारपासून लागू झाला आहे. यामुळे अमेरिकेत येणारे चिनी सामान दुप्पट किमतीपेक्षा जास्त किमतीला विकावे लागणार आहे.
टॅरिफवर टीका करणारा फसवा, धोकेबाज - ट्रम्प
"टॅरिफवर टीका करणारा जो कोणीही असेल तो एक फसवा आणि धोकेबाज आहे. अमेरिकेने ९० हजार कारखाने गमावले तेव्हा त्यांनी त्याबद्दल विचार केला नाही," असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना सांगितले.