चीनची मालदीवमध्ये 'वॉटर डिप्लोमसी'; तिबेटी हिमनद्यांतून १५०० टन पाणी भेट

चीनने तिबेटी हिमनद्यांमधले १५०० टन पाणी मालदीवला भेट दिले आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ही अशी दुसरी देणगी आहे. इतकेच नव्हे, तर...
चीनची मालदीवमध्ये 'वॉटर डिप्लोमसी'; तिबेटी हिमनद्यांतून १५०० टन पाणी भेट

माले : चीनने तिबेटी हिमनद्यांमधले १५०० टन पाणी मालदीवला भेट दिले आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ही अशी दुसरी देणगी आहे. इतकेच नव्हे, तर बदलत्या हवामानाचा फटका सहन करणाऱ्या मालदीव या छोट्या बेटांच्या देशात हवामान निरीक्षण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी मालदीव आणि चीन सहकार्य करत आहेत. विशेषत: नोव्हेंबर २०२३ मध्ये चीन समर्थक मोहम्मद मुइझ्झू यांनी मालदीवच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून चीनने सहकार्य वाढवले आहे. मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीन देशाला संरक्षण उपकरणे पुरवण्यासाठीही मदत करत आहे.

चीनच्या झिझांग (तिबेट) स्वायत्त प्रदेशाने मालदीव सरकारला १५०० टन मिनरल वॉटर भेट दिले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भेट दिलेले पाणी पिण्याच्या टंचाईच्या काळात वापरण्यासाठी वितरीत केले जाईल. यापूर्वी २७ मार्च रोजी मालदीव सरकारने चीनकडून १५०० टन पाण्याची अशीच खेप मिळाल्याची घोषणा केली होती. मालदीवमधील चिनी राजदूत वांग लिक्सिन यांनी देणगी सुपूर्द केल्याच्या समारंभात परराष्ट्र मंत्री मूसा झमीर यांनी सांगितले की, विशेषत: आव्हानात्मक आणि संकटाच्या काळात चीन मालदीवचा चांगला मित्र राहिला आहे. मंत्री महोदयांनी शिनजियांग स्वायत्त प्रदेशातील लोकांच्या दयाळूपणाबद्दल आणि सदिच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रवाळ बेटांमध्ये पाणी कमी

मालदीवमधील १,१९२ बेटे मुख्यतः कोरल रीफ आणि सँडबारने बनलेली आहेत. त्यामुळे तेथे भूजल आणि गोडे पाणी अत्यंत दुर्मिळ आहे आणि हवामान बदलामुळे पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये भारताने माले वॉटर अँड सीवरेज कंपनी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्यानंतर पाण्याच्या संकटादरम्यान 'ऑपरेशन नीर' राबवले होते. मात्र, आता मालदीव चीनकडून पाण्याची मदत घेत आहे.

logo
marathi.freepressjournal.in