
बीजिंग : अमेरिकेने जपानमध्ये तैनात केलेली मध्यम पल्ल्याची ‘टायफून’ क्षेपणास्त्र प्रणाली हटवावी, अशी मागणी चीनने अमेरिकेकडे केली आहे. ही क्षेपणास्त्र प्रादेशिक सामरिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
चीनच्या तीव्र आक्षेपांची पर्वा न करता अमेरिका आणि जपानने संयुक्त लष्करी सरावाच्या नावाखाली जपानमध्ये ‘टायफून’ क्षेपणास्त्र प्रणालीची तैनात केली आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
चीन या हालचालीचा तीव्र निषेध करतो आणि ठामपणे विरोध करतो. आशियाई देशांमध्ये अमेरिकेची ‘टायफून’ मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीची तैनाती इतर देशांच्या वैध सुरक्षा हितांना धक्का पोहोचवते. प्रादेशिक शस्त्रस्पर्धा आणि लष्करी संघर्षाचा धोका वाढवते आणि प्रादेशिक सामरिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करते, असे त्यांनी म्हटले.
अमेरिका आणि जपानने इतर देशांच्या सुरक्षा चिंतेचा प्रामाणिकपणे आदर करावा आणि प्रादेशिक शांतता व स्थैर्यासाठी सकारात्मक भूमिका बजवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका आणि जपानने प्रादेशिक देशांच्या आवाजाला प्रतिसाद द्यावा, चुकीची पावले मागे घ्यावीत आणि ‘टायफून’ क्षेपणास्त्र प्रणाली शक्य तितक्या लवकर काढून टाकावी, अशी मागणी चीनने केली.
यापूर्वी चीनने फिलिपिन्समधील ‘टायफून’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या तैनातीला आक्षेप घेतला होता. चीनचा फिलीपिन्सबरोबर दक्षिण चीन समुद्रावरून वाद सुरू आहे.