चीन उभारणार जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प; भारताच्या अडचणी वाढणार; १३७ अब्ज डॉलर खर्च

तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीनने मंजुरी दिली आहे. हे धरण ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागात बांधले जाणार आहे. हे धरण भारताच्या सीमेजवळ बांधण्यात येणार आहे.
चीन उभारणार जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प; भारताच्या अडचणी वाढणार; १३७ अब्ज डॉलर खर्च
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

बीजिंग : तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीनने मंजुरी दिली आहे. हे धरण ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागात बांधले जाणार आहे. हे धरण भारताच्या सीमेजवळ बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे भारत व बांगलादेशला मोठा फटका बसणार आहे.

चीन या जलविद्युत प्रकल्पातून दरवर्षी ३०० अब्ज किलोवॉट वीजनिर्मिती प्रतितास करू शकतो. सध्या जगातील सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस हे चीनमध्ये आहे. या धरणातून ८८.२ अब्ज किलोवॉटची वीजनिर्मिती केली जात आहे. या निर्मितीच्या तिप्पट वीजनिर्मिती नवीन धरणातून होईल.

या योजनेद्वारे चीनने कार्बन उत्सर्जन कमी करणे, अभियांत्रिकी उद्योगांना प्रोत्साहित करणे, तिबेटमध्ये रोजगारनिर्मिती आदी लक्ष्य ठेवले आहे. या धरणासाठी १३७ अब्ज डॉलर खर्च होणार आहे.

या योजनेत तिबेटमध्ये किती जणांना विस्थापित केले जाईल, याची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली नाही. या धरणामुळे तिबेटच्या पठारी व पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटच्या या जलविद्युत प्रकल्पामुळे भारत व बांगलादेशच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही.

भारत आणि बांगलादेशला धोका

ब्रह्मपुत्रा नदीचा ५० किमीचा एक भाग २ हजार मीटर उंचीवर आहे. त्यामुळे ही भौगोलिक परिस्थिती जलविद्युत प्रकल्पांसाठी आदर्शवत आहे. या प्रकल्पाला भारत व बांगलादेशचा विरोध आहे. या योजनेमुळे स्थानिक पर्यावरणाचे नुकसान होईल. तसेच नदीच्या खालील प्रवाहाची दिशा बदलेल. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटहून निघून अरुणाचल प्रदेश, आसामद्वारे बांगलादेशात समुद्राला मिळते.

चीनचा कुटील डाव

या योजनेमुळे भारतात चिंता व्यक्त होत आहे. कारण या धरणामुळे ब्रह्मपुत्रेचा प्रवाह चीन नियंत्रित करू शकेल. पाण्यावर अधिकार मिळाल्याने शेजारी देशांसोबत चीनचा संघर्ष होऊ शकतो. तसेच सीमावर्ती भागात पूर आणण्यासाठी पाणी सोडण्याचा कुटील डावही चीन आखू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.