
बीजिंग : अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयात कर आकारण्याच्या निर्णयावरुन माघार न घेतल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ ९ एप्रिलपासून लागू करण्याचे मंगळवारी जाहीर केले आहे. व्हाइट हाऊसने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. यामुळे टॅरिफयुद्ध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने जगभरातील देशांवर परस्पर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननेही अमेरिकेप्रमाणेच तेथील वस्तूंवर (अमेरिकेतून आयात होणाऱ्या) ३४ टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, ८ एप्रिलपर्यंत जर चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले ३४ टक्के शुल्क हटवले नाही तर ९ एप्रिलपासून अमेरिका चिनी वस्तूंवर ५० टक्के शुल्क आकारेल, अशी सक्त ताकीद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. तसेच, शुल्क न हटवल्यास चीनने प्रस्तावित केलेल्या कोणत्याही बैठकीवरील वाटाघाटी त्वरित संपुष्टात येतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर, ‘आम्ही अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग कदापि स्वीकारणार नाही. अमेरिकन टॅरिफच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू’, असे उत्तर चीनने दिले होते. अखेर आता अमेरिकेने थेट १०४ टक्के टॅरिफ चीनवर लागू केले आहे.
काय म्हटले होते चीनने?
चीनवर शुल्क वाढवण्याचा अमेरिकेचा इशारा म्हणजे अमेरिका चुकांमागून चुका करत आहे. याद्वारे पुन्हा एकदा अमेरिकेच्या धमकीखोर वृत्तीचे दर्शन होते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिका हट्टाने आपलेच धोरण राबवत राहिली, तर चीन शेवटपर्यंत लढेल. अमेरिका आपल्या मर्जीप्रमाणे चालण्यासाठी मनमानी करत असल्यास चीनही याबाबत शेवटपर्यंत लढेल. व्यापार युद्धासाठी चीन तयार आहे. यातून चीन अधिक मजबूत देश म्हणून उदयास येईल. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होईल, पण आभाळ कोसळणार नाही, असे चीनने म्हटले होते.
हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालणार - चीन
व्यापार युद्धाचा फटका आता अमेरिकन चित्रपटसृष्टीलाही बसण्याची शक्यता आहे. हॉलिवूडच्या सिनेमांवर बंदी घालण्याचा विचार चीनने चालवला आहे. ही बंदी घातल्यास अमेरिकन चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान होऊ शकते.
कंपन्यांच्या संरक्षणासाठी सिंगापूरमध्ये कृती दल स्थापन
अमेरिकन टॅरिफमुळे सिंगापूरमधील कंपन्या व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी सिंगापूर सरकारने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केला आहे, अशी घोषणा सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी केली. उपपंतप्रधान व व्यापार मंत्री गान किम याँग यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे. यात आर्थिक संस्था, सिंगापूर बिझनेस फेडरेशन, सिंगापूर एम्प्लॉईज फेडरेशन व कामगार संघटनांचा समावेश आहे. जागतिक परिस्थिती 'अस्थिर' बनली आहे. असे सांगून पंतप्रधान वाँग म्हणाले की, कृती दल उद्योगांना आणि कामगारांना तत्काळ अनिश्चिततेचे निराकरण करण्यास, लवचिकता आणण्यास आणि नवीन आर्थिक परिदृश्याशी जुळवून घेण्यास मदत करेल.