चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची व्हिएतनामला भेट- दक्षिण चीन समुद्रातील वादावर परस्पर स्वीकारार्ह तोडग्याचा प्रस्ताव

कोरोनापश्चात काळात चीनमधील अनेक परदेशी उद्योगधंदे तेथून बाहेर पडून अन् देशांचा पर्याय निवडत आहेत
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची व्हिएतनामला भेट- दक्षिण चीन समुद्रातील वादावर परस्पर स्वीकारार्ह तोडग्याचा प्रस्ताव
PM

हनोई : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे मंगळवारी दोन दिवसीय भेटीसाठी व्हिएतनाममध्ये आगमन झाले. हनोईतील विमानतळावर उतरल्यानंतर जिनपिंग यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस गुयेन फु ट्रोंग, अध्यक्ष व्हो व्हॅन थुओंग आणि पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी जिनपिंग यांनी काहीशी सबुरीची भूमिका घेऊन दक्षिण चीन समुद्रातील वाद सोडवण्यासाठी परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला.

चीनने दक्षिण चीन समुद्रातील जवळपास सर्व प्रदेशावर हक्क सांगितला आहे. व्हिएतनाम, फिलीपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनी दक्षिण चीन समुद्रावर प्रतिदावे केले आहेत. त्यामुळे चीनचा शेजारच्या अनेक देशांशी संघर्ष निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी फिलीपिन्सने चीनच्या विरोधातील खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला होता. पण चीनने त्याचा निकाल अमान्य केला. दक्षिण चीन समुद्रात चीन अधिकाधिक आक्रमक बनत चालला असून अमेरिकेसह शेजारी देशांच्या नौकांबरोबर त्यांचे सतत संघर्षाचे प्रसंग उभे राहत आहेत. चीन आणि व्हिएतनाम यांच्यात १९७९ साली युद्धही झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या अध्यक्षांची व्हिएतनाम भेट महत्त्वाची आहे.

कोरोनापश्चात काळात चीनमधील अनेक परदेशी उद्योगधंदे तेथून बाहेर पडून अन् देशांचा पर्याय निवडत आहेत. त्यात शेजारील व्हिएतनाम, तैवान यांच्यासह भारतालाही पसंती मिळत आहे. त्यामुळे चीनने काहीशी मवाळ भूमिका स्वीकारली आहे. अलीकडच्या काळात चीनने अमेरिका आणि जपान यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्या पाठोपाठ चीनने आता व्हिएतनामबरोबरील तणावही निवळण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात उभय देशांत विविध सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in