बीजिंग : चीनने त्यांचे चांगे-६ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ, पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला यशस्वीपणे उतरले असल्याचा दावा केला आहे.
चाँगे-६ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील एटकेन बेसिनमध्ये रविवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी उतरल्याची माहिती चीनने दिली. चीनने ही मोहीम ३ मे रोजी सुरू केली होती. त्याद्वारे चंद्रावरून साधारण २ किलो खडक आणि मातीचे नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. वेनचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित केल्यानंतर चांगे-६ अंतराळयान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत होते. मिशनचा लँडर विभाग नंतर ऑर्बिटरपासून विभक्त झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आणि पृथ्वीवरून जो भाग दिसतो त्याच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर यान उतरवणे ही जोखमीची प्रक्रिया आहे. पण चागे-६ यानाने त्यात यश मिळवल्याचे चीनने म्हटले आहे. बीजिंगमधील एरोस्पेस फ्लाइट कंट्रोल सेंटरमध्ये शास्त्रज्ञांनी टाळ्यांचा कडकडात हा आनंद साजरा केला.
चीनने चंद्रावर यान पाठवून तेथील मातीचे नमुने आणण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी २०२० साली चीनने चांगे-५ मोहिमेद्वारे चंद्रावरील ओशनस प्रोसेलेरम नावाच्या भागातून १.७ किलो दगड-मातीचे नमुने पृथ्वीवर आणले होते. मँचेस्टर विद्यापीठातील चंद्र भूविज्ञानात तज्न असलेले प्रोफेसर जॉन पेर्नेट-फिशर यांनी अमेरिकी अपोलो आणि चिनी मोहिमांनी चंद्रावरून आणलेल्या दगड-मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते या मोहिमांतून पृथ्वीवर उपलब्ध नसलेली द्रव्ये मिळण्याची शक्यता आहे.
चंद्र पुन्हा केंद्रस्थानी
यापुढे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमांमध्ये वाढ होणार आहे. कारण तेथे बर्फ असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चंद्रावर मानवी वसाहती करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकेल. त्यामुळे चीनने २०३० सालापर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेने १९६०च्या दशकातील अपोलो मोहिमांनंतर आता पुन्हा चंद्रावर याने पाठवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था २०२६ मध्ये आर्टेमिस-३ मोहीम हाती घेत असून, त्याद्वारे चंद्रावर पुन्हा अंतराळवीर पाठवण्याची योजना आहे.