ढाका : बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभूंना अटक केली आहे. ढाका विमानतळावर त्यांना अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला आहे. २२ नोव्हेंबरला चिन्मय कृष्णदास प्रभू यांनी बांगलादेशातील रंगपूर येथे हिंदूंच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कारवाई केली. या रॅलीत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा विरोध केला गेला. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार हिंदूंना त्रास देत आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ खुलेपणाने इस्कॉन व त्यांच्या भक्तांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. मेहरपूर येथे इस्कॉन मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हिंदू मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिन्मय प्रभू यांनी चिंता व्यक्त केली होती. बांगलादेशात हिंदू व अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटत आहे, असे ते म्हणाले. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये चिन्मय कृष्णदास प्रभू यांच्यावर बांगलादेश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला. हिंदू संघटनेशी संबंधित अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.