महागाईच्या चटक्यांनी नागरिक त्रस्त

डाळ, तांदूळ, खाद्यतेलाच्या चढत्या किंमती
महागाईच्या चटक्यांनी नागरिक त्रस्त

गेल्या काही महिन्यांपासून इंधन, घरगुती आणि व्यावसायिक वापराचा सिलिंडर, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. या गोष्टीचा साहजिकच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई अशा विषम स्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत.

महागाई कशी आणि किती प्रमाणात वाढतेय हे पाहायचं झाल्यास दैनंदिन वापरातील गव्हाच्या पीठाचे दर हे उत्तम उदाहरण ठरु शकेल. चपाती हा आपल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा पदार्थ होय. एक माणूस एकावेळी किमान चार चपात्या खातो. हिशेब करायचा झाला तर चार चपात्यांसाठी १०० ग्रॅम पीठ लागते. १० वर्षांपूर्वी एक किलो गव्हाचे पीठ २२ रुपये ४८ पैसे होते. चार चपात्यांसाठी पिठासाठी २ रुपये २४ पैसे खर्च येत होता. आता गव्हाच्या एक किलो पिठाचा दर ३२ रुपये ९१ पैसे प्रतिकिलो झाला आहे. हिच स्थिती खाद्यतेल, तांदूळ आदी गोष्टींची आहे. ९ मे रोजी देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत ३२ रुपये ९१ पैसे होती. केवळ एका वर्षात एक किलो पिठाच्या दरात चार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली.

गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे दर वाढल्याने साहजिकच बेकरी उत्पादनांच्या किमतीदेखील वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत बिस्किटं, ब्रेड आदींच्या किमतींत वाढ झाली आहे. ब्रेडची किरकोळ दरवाढ या वर्षी मार्चमध्ये ८.३९ टक्के होती. ही वाढ ७ वर्षातील उच्चांकी आहे. जॅम बिस्किट, मेरी गोल्ड सारखे बेकरी पदार्थ उत्पादित करणारी ब्रिटानिया कंपनी आगामी काळात आपल्या उत्पादनाच्या किमती १० टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहे. रशिया-युक्रेन युद्ध गेले दोन महिने सुरु असल्याने त्याचा परिणाम महागाईवर होत असून मैदा, साखर, काजू, गव्हाचं पीठ या पदार्थांचे दर वाढत आहेत, अशी माहिती ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी दिली आहे.

गव्हाच्या पिठाचे दर वाढण्यामागे दोन कारणे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकीकडे देशात गव्हाचं उत्पादन घटत असून, गव्हाचा साठादेखील कमी होत आहे. दुसरीकडे अन्य देशांकडून भारतीय गव्हाला मागणी वाढत आहे. शासकीय आकडेवारीनुसार, ९ मे रोजी राजधानी दिल्लीत एक किलो पिठाचा दर २७ रुपये, अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये ५९ रुपये तर मुंबईत ४९ रुपये होता. १ जानेवारीपासून आतापर्यंत पिठाचे दर ६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे गव्हाचे उत्पादन घटले आहे.

जागतिक गहू निर्यातीत रशिया आणि युक्रेनचा वाटा एक चतुर्थांश आहे. २०१९ मध्ये रशियाने ८.१४ अब्ज डॉलर तर युक्रेनने ३.११ अब्ज डॉलरचा गहू निर्यात केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु असल्याने जगभरात गव्हाचा तुटवडा जाणवत असून, त्याचे दर वाढत आहेत. भारतीय गव्हाला अन्य देशांकडून मागणी वाढलेली आहे. त्यामुळे भारतात गव्हाचे दर वाढले आहेत. त्याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने गव्हाच्या वाहतुकीचे दर वाढले आहेत.

केवळ गव्हाचे पीठ नाही तर डाळी, तांदूळ, खाद्य तेल आणि मीठाच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. १० वर्षांत एक किलो तांदळाची किंमत ४२ टक्क्यांनी वाढली आहे. ९ मे २०१३ रोजी एक किलो तांदळाची सरासरी किंमत २५ रुपये ४० पैसे होती. मात्र ९ मे २०२२ ला हिच किंमत वाढून ३६ रुपये ७० पैसे झाली आहे. त्याचप्रमाणे तूर डाळीचे दर ४८ टक्क्यांनी वाढून किलोला ७० रुपयांवरून १०२ रुपयांवर पोहोचले आहे. उडीद डाळीचे दर ५७ रुपये ६२ पैशांवरून १०५ रुपये २ पैशांवर पोहोचले आहेत. ९ मे २०१३ रोजी मूग डाळ ७३ रुपये ६८ पैसे होती. हेच दर ९ मे २०२२ रोजी १०३ रुपयांवर पोहोचले आहेत. मसूर डाळीचे दर ५४ रुपये ८२ पैशांवरून ९६ रुपये ७७ पैसे प्रतिकिलो झाले आहेत.

शेंगदाना तेलाचे दर ४३,

मोहरीचे ८४ टक्के वाढले

खाद्यतेलाच्या किमतीही वाढत आहेत. दहा वर्षांत शेंगदाणा तेलाचे दर ४३ टक्क्यांपर्यंत तर मोहरीच्या तेलाचे दर ८४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पामतेल गेल्या दहा वर्षांत १४० टक्क्यांनी महागले आहे. दुसरीकडे वनस्पती तेल गेल्या दहा वर्षांत १२९ टक्क्यांनी महागलं आहे. ९ मे २०१३ रोजी शेंगदाणे तेलाचे दर १३१ रुपये ११ पैसे होते. हेच दर ९ मे २०२२ रोजी १८७ रुपये ११ पैशांवर पोहोचले आहेत. मोहरीचं तेल १०० रुपये ८८ पैशांवरून १८५ रुपये ५२ पैसे, सोयाबीन तेल ८५ रुपये ७८ पैशांवरून १७० रुपये ३३ पैसे, सूर्यफूल तेल ९८ रुपये ३८ पैशांवरून १९२ रुपये ३४ पैसे तर पाम तेल ६६ रुपये ३८ पैशांवरून १५९ रुपये ५१ पैशांवर पोहोचले आहे. मिठाचे दरही गेल्या काही वर्षात वाढले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in