मतमोजणीवेळी बलुचिस्तानमध्ये चकमक, गोळीबारात २ ठार, १४ जखमी
कराची : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील एका मतदारसंघात मतमोजणीच्या वेळी दोन राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र चकमकीत किमान दोन ठार आणि १४ जखमी झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) समर्थक कराचीच्या सीमेवर असलेल्या हब या औद्योगिक शहरामध्ये रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयाबाहेर भिडले. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत, बीएपीच्या मुहम्मद सालेह भूतानी यांनी अनधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचा दावा केला होता, परंतु पीपीपीच्या अली हसन झेहरी यांनी निकाल रद्द करण्यासाठी मतांची फेरमोजणी मागितली.
त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पुन्हा मतमोजणीचे आदेश दिले. एसएसपी हब मंजूर अहमद बुलेदी यांनी पत्रकारांना सांगितले की, बुधवारी ३९ मतदान केंद्रांच्या मतांची फेरमोजणी सुरू असताना हाणामारी झाली आणि दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली. यावेळी गोळीबार झाला त्यात दोन ठार आणि १४ जण जखमी झाले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.