वॉशिंग्टन : वातावरण बदलाचे परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहेत. त्यामुळेच उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्या म्हणजेच ४०० कोटी लोकसंख्येला यंदा उष्णतेने होरपळून काढले. वातावरण बदलामुळे मे २०२४ ते मे २०२५ या वर्षभरात नागरिकांना एक महिना अधिक उष्ण तापमानाचा ताप सहन करावा लागला.
या उष्णतेच्या लाटेमुळे लोक आजारी पडले, मृत्यू झाले, पिकांचे नुकसान झाले, ऊर्जा व आरोग्य देखभाल प्रणालींवर दबाव आला.
वर्ल्ड वेदर एट्रिब्युशन, क्लायमेट सेंट्रल आणि रेड क्रॉसच्या अहवालात दावा केला आहे की, उष्णता वाढण्यास मोठे कारण हे वातावरण बदल आहे. पूर व चक्रीवादळ हे कायम चर्चेत असतात. पण, तीव्र उष्णता ही गंभीर बाब आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद केली जात नाही. या मृत्यूंची नोंद ह्रदयरोग, किडनी निकामी होणे आदी आजारांच्या नावावर नोंदवली जाते.
घरात किंवा रुग्णालयात मृत्यू
हा अहवाल तयार करणारे इम्पिरियल कॉलेज लंडनमधील वातावरण बदलाचे असोसिएट प्राध्यापक फ्रेडरिक ओटो म्हणाले की, उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे शांतपणे होणाऱ्या हत्या आहेत. उष्णतेच्या लाटेत लोक रस्त्यावर मरत नाहीत. त्यांचे मृत्यू रुग्णालयात किंवा घरात होतात. ते सर्वसाधारणत: इतरांना कळत नाहीत.
या अहवालात नमूद केले आहे की, मार्चमध्ये मध्य आशिया, फेब्रुवारीत दक्षिण सुदान व गेल्यावर्षीच्या जुलैमध्ये भूमध्य सागरात वाढलेल्या उष्णतेच्या घटनांमध्ये वाढते तापमान हे कारणीभूत होते. गेल्यावर्षी जुलैमध्ये मोरोक्कोत तापमान ४८ अंशावर पोहचल्याने २१ जणांचा मृत्यू झाला होता.
इशारा यंत्रणा वाढवणे गरजेचे
‘रेड क्रॉस रेड क्रिसेंट क्लायमेट सेंटर’चे शहर विभागाचे प्रमुख रूप सिंह म्हणाले की, तापमान वाढत असल्याची जाणीव नागरिकांमध्ये आहे. पण, हे वातावरण बदलामुळे होते हे त्यांना कळत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची माहिती देणाऱ्या इशारा यंत्रणा वाढवण्याची गरज आहे. तसेच जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करणे गरजेचे आहे.
उष्णतेच्या दिवसांची संख्या वाढली
वातावरण बदलामुळे उष्णतेच्या घटना किती वाढल्या आहेत हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. जगातील सर्वच देशात वातावरण बदलामुळे उष्णतेच्या लाटांच्या दिवसांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. कॅरेबियन बेटांवरील उष्णतेचे दिवस वाढले आहेत, तर अमेरिकेच्या प्यूर्टो रिको या भागात १६१ दिवस उष्णतेचे होते. जर वातावरण बदल नसते तर केवळ ४८ दिवस अधिक उष्णता जाणवली असती.