वाद, मतभेद हे चर्चेने, राजनैतिक मार्गानेच सोडवावे - एस. जयशंकर

रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने बोलत होते.
वाद, मतभेद हे चर्चेने, राजनैतिक मार्गानेच सोडवावे - एस. जयशंकर
Published on

कझान : संघर्ष आणि तणावाच्या स्थितीवर तोडगा काढणे हीच काळाची मुख्य गरज आहे. वाद आणि मतभेदांवर चर्चेने आणि राजनैतिक स्तरावर मार्ग काढला पाहिजे आणि एकदा करार करण्यात आले की त्याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे केले.

रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने बोलत होते. आपण कठीण काळात भेटत आहोत. दीर्घकालीन आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जगाने नव्या विचाराने तयारी केली पाहिजे आणि आमची तसे करण्याची मानसिकता आहे हाच संदेश या परिषदेतून दिला गेला आहे, असेही जयशंकर म्हणाले.

सध्या युद्धाचे पर्व नाही, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. संघर्ष आणि तणावाच्या स्थितीवर तोडगा काढणे हीच काळाची मुख्य गरज आहे. वाद आणि मतभेद सामोपचाराने मिटविले पाहिजेत आणि एकदा करार झाला की त्याचा मान राखला गेलाच पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे अपवाद वगळून पालन झाले पाहिजे, दहशतवादाला कोणत्याही स्थितीत थारा देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवसाच्या सत्राला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲण्टोनिओ ग्युटेरर्स यांच्यासह २० हून अधिक जागतिक प्रतिनिधी हजर होते.

logo
marathi.freepressjournal.in