पाकिस्तानी अध्यक्षांच्या वक्तव्यावरून वाद

पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने मात्र या वक्तव्यापासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी पॅलेस्टाईन समस्येवर एक-राष्ट्र उपाय प्रस्तावित करून वादाला तोंड फोडले. पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने मात्र या वक्तव्यापासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला आहे. पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात राष्ट्रपती अल्वी यांना एक-राष्ट्र उपायाच्या सूचनेचे निवेदन केले.

इस्रायलला जर दोन-देश उपाय मान्य नसेल, तर एक-देश उपाय हा एकमेव मार्ग आहे. त्यात यहूदी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना समान राजकीय अधिकार असे अल्वी यांनी म्हटले. प्रसारमाध्यमांत त्यावर मोठा गाजवाजा झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या कार्यालयाने हे निवेदन मागे घेतले आणि एक नवीन निवेदन जारी केले, ज्यामध्ये वादग्रस्त प्रस्तावाचा कोणताही उल्लेख वगळण्यात आला.

पाकिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी अध्यक्ष आरिफ अल्वी यांचा प्रस्ताव देशाच्या तत्वनिष्ठ आणि ऐतिहासिक भूमिकेशी सुसंगत नसल्याचे म्हटले. जिलानी म्हणाले की, अध्यक्षांचे विधान प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच त्यांच्या कार्यालयाला पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर पाकिस्तानची अधिकृत भूमिका सांगून स्पष्टीकरण द्यावे लागले. इस्रायल-पॅलेस्टाइनच्या १९६७ च्या सीमेवर आधारित आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ठराव क्रमांक २४२ च्या अनुषंगाने इस्रायल-पॅलेस्टिनी समस्येवर द्वि-राष्ट्र उपाय हीच पाकिस्तानची आजवरची अधिकृत भूमिका राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in