
अमेरिकेच्या फेडरल रिझव्हने व्याजदरात ०.७५ टक्का वाढ केली आहे. गेल्या २८ वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेत महागाईचा दर ४० वर्षातील उच्च स्तरावर आहे. मे महिन्यात महागाईचा दर ८.६ टक्के इतका नोंदवला गेला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने हा निर्णय घेण्यात आला. व्याजदरातील ०.७५ टक्का वाढ ही १९९४ नंतरची सर्वाधिक आहे. अमेरिकेतील व्याजदरातील वाढीमुळे भारतीय बाजारपेठेवर संकट निर्माण झाले आहे.. अमेरिकेपाठोपाठ स्वीस नॅशनल बँकेने गेल्या १५ वर्षांत प्रथमच व्याजदरात वाढ केली आहे.
व्याजदरवाढीमुळे डॉलर आणखी मजबूत होईल आणि त्याचा परिणाम रुपयावर होईल. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सर्वात नीचांकी पातळीवर आहे. बुधवारी रुपायामध्ये १८ पैशांची मोठी घसरण होत तो नव्या नीचांकी ७८.२२ प्रती डॉलरवर बंद झाला होता.
अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम भारतावर देखील होणार आहे. अमेरिकेपाठोपाठ भारतासह जगातील अन्य देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून पुन्हा व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात होणार आहे. आता पुन्हा भारतातही रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.