इराणवर सायबर हल्ला ;देशातील ७० टक्के पेट्रोल पंप बंद : इस्रायलशी संबंधित गटाचे कृत्य

सोमवारच्या हल्ल्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावर २०१० साली झालेल्या 'स्टक्सनेट' सायबर हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
इराणवर सायबर हल्ला ;देशातील ७० टक्के पेट्रोल पंप बंद : इस्रायलशी संबंधित गटाचे कृत्य
PM

तेहरान : इराणवर सोमवारी सायबर हल्ला झाला असून त्यामुळे देशातील ७० टक्के पेट्रोल पंप बंद पडले. इस्रायलशी संबंधित 'गोंजेश्के दरांदे' (प्रीडेटरी स्पॅरो) नावाच्या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाने पूर्वीही इराणवर सायबर हल्ले केले होते. इस्रायलने या हल्ल्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तेथील प्रसारमाध्यमांनी इराणवरील हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

इराणमधील बहुतांश पेट्रोल पंप सोमवारी सकाळपासून अचानक बंद पडले. राजधानी तेहरानमध्ये विशेषत्वे हा परिणाम दिसून आला. पेट्रोल पंपांवरील ऑटोमॅटिक यंत्रणा काम करेनाशी झाली. त्यामुळे पंपावरील कामकाज मॅन्युअली करावे लागले. त्यात बराच वेळ खर्ची पडल्याने पंपांवर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या. इराणच्या सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले की, परिस्थिती पूर्ववत करण्यास किमान पाच ते सहा तास लागतील.

इराणचे खनिज तेल मंत्री जवाद ओवजी यांनी देशात सायबर हल्ला झाल्याचे मान्य केले. देशातील ७० टक्के पेट्रोल पंपांवरील सेवेवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. तेल मंत्रालयाकडून देशातील ३८०० पेट्रोल पंपांचे संचालन केले जाते. त्यापैकी केवळ १६५० पेट्रोल पंप सुरू असल्याचे मंत्रालयाकडून नंतर सांगण्यात आले.

इस्रायलशी संबंधित 'गोंजेश्के दरांदे' (प्रीडेटरी स्पॅरो) या गटाने इराणवरील सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाने एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'आमच्या गटाने आज इराणमधील बहुतांश पेट्रोल पंपांवर सायबर हल्ला केला. इराण आणि त्यांची मदत असलेल्या गटांनी मध्य-पूर्वेच्या प्रदेशात घेतलेल्या आक्रमक भूमिकेला दिलेले हे उत्तर आहे.’ या संदेशात इराणचे अध्यक्ष अली खामेनी यांना उद्देशून म्हटले आहे की, 'खामेनी, आगीशी खेळ करण्याची किंमत मोजावी लागते.’ प्रीडेटरी स्पॅरो गटाने यापूर्वीही इस्रायलवर सायबर हल्ले केले होते. त्यांनी २०२१ साली अशाच प्रकारे हल्ला करून पेट्रोल पंप बंद पाडले होते. तसेच इराणच्या रेल्वे वाहतूक यंत्रणा आणि स्टील कारखान्यांवरही सायबर हल्ले केले होते.

'स्टक्सनेट'च्या आठवणी जाग्या

 सोमवारच्या हल्ल्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावर २०१० साली झालेल्या 'स्टक्सनेट' सायबर हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. हा संगणक व्हायरस पेन ड्राइव्हमधून पसरला होता. त्याने इराणच्या १४ अणुप्रकल्पांमधील २० हजार संगणक आणि अणुप्रकल्पातील ९०० सेंट्रिफ्यूज निकामी केले होते. त्यासाठी इराणने अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले होते.

logo
marathi.freepressjournal.in