मोरोक्कोत धरणीकंप;८२२ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल नोंदवली
मोरोक्कोत धरणीकंप;८२२ जणांचा मृत्यू

रबात : मध्य पूर्वेतील मोरोक्को देशात शुक्रवारी रात्री मोठा भूकंप झाला. या भूकंपात ८२२ जणांवर झोपेतच काळाने घाला घातला असून ६७२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची रिश्टर स्केलवर क्षमता ७.२ नोंदवली आहे, अशी माहिती मोरोक्को जिओलॉजिकल सेंटरने दिली. बचाव व मदत पथकांनी तातडीने काम सुरू केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू एटलास पर्वताजवळ इघिल गावात आहे. हा भाग माराकेश शहरापासून ७० किमी दूर आहे. या भूकंपाची खोली जमिनीपासून १८.५ किमी आहे. भूकंपाचे धक्के पोर्तुगाल व अल्जिरियापर्यंत बसले.

या भूकंपामुळे मोरोक्कोतील अनेक इमारती पडल्या असून लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते. युनेस्कोच्या पुरातन वारसा हक्क स्थळ म्हणून गणल्या गेलेल्या माराकेशमधील लाल भिंतींचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल नोंदवली. या भागात आलेला हा १२० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप आहे. उत्तर आफ्रिकेत भूकंप दुर्मिळ आहेत. यापूर्वी १९६० मध्ये अगादिर येथे ५.८ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते.

logo
marathi.freepressjournal.in