मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीचा मृत्यू

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) उपप्रमुख हाफीझ अब्दुल रहमान मक्की याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानमध्येच मृत्यू झाला.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीचा मृत्यू
Published on

लाहोर : मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) उपप्रमुख हाफीझ अब्दुल रहमान मक्की याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानमध्येच मृत्यू झाला. मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्याच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफीझ सईदचा मेहुणा होता. मक्की हा लष्कर-ए-तोयबाच्या टेरर फंडिंगवर लक्ष ठेवायचा. मे २०१९ मध्ये, मक्कीला पाकिस्तान सरकारने अटक केली आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवले होते. २०२० मध्ये, एका पाकिस्तानी न्यायालयाने त्याला दहशतवादी वित्तपुरवठ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जानेवारी २०२३ मध्ये, मक्कीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. भारतात डिसेंबर २००० मध्ये लाल किल्ल्यावर झालेला दहशतवादी हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर जानेवारी २००८ मध्ये झालेला हल्ला, मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर श्रीनगरमधील करन नगर इथे फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेला हल्ला, या सर्व हल्ल्यांची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने घेतल्यामुळे अब्दुल रहमान मक्कीचा या कटात सहभाग असल्याचे बोलले जाते.

logo
marathi.freepressjournal.in