
लॉस एन्जेलिस : लॉस एंजेलिसवरून अटलांटाला निघालेल्या विमानाच्या इंजिनाला उड्डाण केल्यानंतर अचानक भीषण आग लागली. आग लागल्यामुळे विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. पण वैमानिकाने विमान तातडीने उतरविले आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले.
शुक्रवारी लॉस एंजेलिसहून अटलांटाला डेल्टा एअरलाइन्सचे विमान निघाले होते. फ्लाईट क्रमांक ‘डीएल-४४६’ने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनमध्ये भीषण आग लागली. उड्डाण घेतलेल्या या विमानाच्या डाव्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. हे पाहून विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानाचे तत्काळ लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या दुर्घटनेत विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सला काहीच दुखापत झाली नाही.
हे विमान बोईंग ७६७-४००चे होते. विमानाचे लँडिंग केल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. महत्त्वाचे म्हणजे या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच इंजिनमध्ये बिघाड झाला आणि आग लागली. वैमानिकाने ताबडतोब आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि विमान पुन्हा विमानतळाकडे वळवले. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानेदेखील तत्काळ मदत केली आणि आपत्कालीन सेवांना सतर्क केले. त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
१५ वर्षे जुने विमान
टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान सर्वात आधी पॅसिफिक महासागराकडे गेले. नंतर डाऊनी आणि पॅरामाउंटवरून प्रदक्षिणा घालून विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाला आग लागल्याचे लक्षात येताच पायलट आणि क्रू मेंबर्सने सर्व आवश्यक तपासणी पूर्ण करत सुरक्षित लँडिंग केले. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. ‘यूएस एव्हिएशन एजन्सी’ने तपास सुरू केला आहे. हे विमान १५ वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे.