बायडेन-जिनपिंग भेटीबाबत चर्चा

अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात ११ ते १७ नोव्हेंबर दरम्यान एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन समिट ही परिषद होणार आहे
बायडेन-जिनपिंग भेटीबाबत चर्चा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान भेटण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात ११ ते १७ नोव्हेंबर दरम्यान एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन समिट ही परिषद होणार आहे. त्यासाठी जिनपिंग अमेरिकेत येणार आहेत. त्यावेळी ते बायडेन यांच्याशी समोरासमोर भेटतील, अशी चर्चा सुरू आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सध्या अमेरिका दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी (अमेरिकेतील शुक्रवारी) त्यांनी बायडेन यांच्यासह अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यानुसार बायडेन आणि जिनपिंग यांच्या भेटीची प्राथमिक तयारी झाली आहे. मात्र, अद्याप तारीख आणि नेमके ठिकाण ठरलेले नाही.

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या विविध मुद्द्यांवरून तणाव वाढला आहे. कोरोनाच्या प्रसाराची जबाबदारी, व्यापारी युद्ध, उच्च तंत्रज्ञानाची चोरी, युक्रेन युद्ध, तैवानच्या एकीकरणाचा प्रश्न, दक्षिण चीन समुद्रातील चीनचे विस्तारवादी धोरण अशा अनेक प्रश्नांवरून अमेरिका आणि चीनमध्ये सध्या वाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते भेटीस तयार होणे ही मोठी बाब मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in