निसर्गात पाचवी शक्ती अस्तित्वात?

अमेरिकेतील फर्मीलॅबच्या शास्त्रज्ञांचा अंदाज
निसर्गात पाचवी शक्ती अस्तित्वात?

वॉशिंग्टन : सध्या विज्ञानाला ज्ञात असलेल्या चार बलांव्यतिरिक्त पाचवे बल निसर्गामध्ये अस्तित्वात असू शकेल, असा अंदाज अमेरिकेतील फर्मीलॅब येथील शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरला तर गेली पाच दशके अस्तित्वात असलेल्या भौतिकशास्त्राच्या मूलभूत संरचनेलाच धक्का बसेल.

गुरुत्वार्षण, विद्युत चुंबकत्व, न्यूक्लिअर स्ट्राँग आणि वीक फोर्स ही निसर्गातील चार प्राथमिक प्रकारची बले असल्याचे सध्याचे विज्ञान मानते. आपल्याला ज्ञात असलेली सर्व बले या चार मूलभूत प्रकारांत विभागली जाऊ शकतात. साधारण पाच दशकांपूर्वी भौतिकशास्त्रात या चार बलांवर आधारित स्टँडर्ड मॉडेलची स्थापना झाली. त्यानुसार निसर्गाच्या विविध नियमांचे स्पष्टीकरण देता येते. विविध बले किंवा अणू-रेणू कोणत्या स्थितीत कसे काम करतील, याचा योग्य अंदाजही या स्टँडर्ड मॉडेलच्या धर्तीवर आजवर अचूकपणे देता येत होता.

वैज्ञानिक जगतात आजच्या या मान्यताप्राप्त चौकटीला धक्का किंवा आव्हान देण्याचे काम अनेक जण करत आहेत. नवनवीन संकल्पना तपासून पाहिल्या जात आहेत. अमेरिकेतील सिकागो शहराजवळ फर्मीलॅब नावाची प्रयोगशाळा असून, तेथे अणू-रेणू आणि त्यांच्याहून लहान कणांना वेगाने वर्तुळाकार फिरवून त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. अशा मोठ्या संयंत्रांना पार्टिकल अॅक्सिलरेटर म्हटले जाते. अशाच प्रकारचे संयंत्र युरोपमध्येही कार्यरत असून, त्याला लार्ज हेड्रॉन कोलायडर म्हटले जाते. तेथेच हिग्ज बोसॉन किंवा गॉड पार्टिकलचा शोध घेतला जात आहे.

फर्मीलॅबमधील शास्त्रज्ञांना काय आढळले

फर्मीलॅबमधील शास्त्रज्ञांनी म्युऑन्स नावाच्या अतिसूक्ष्मकणांना शक्तिशाली अतिवाहक (सुपरकंडक्टिंग) चुंबक वापरून त्यांच्यात कंपने निर्माण केली. मात्र, म्युऑन्समधील ही कंपने नेहमीपेक्षा अधिक असलेले आढळले. तेथे शास्त्रज्ञांना शंका आली. म्युऑन्समधील ही अतिरिक्त हालचाल भौतिकशास्त्राच्या स्टँडर्ड मॉडेलच्या चौकटीत राहून स्पष्ट करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जगाला आजवर ज्ञात नसलेले पाचवे बल त्यामागे असावे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला. त्यांचे हे निष्कर्ष फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in