इमिग्रेशन धोरण होते कठोर, ट्रम्प यांनी दिली कबुली; 'डेमोक्रॅटिक 'समवेत काम करण्याची दर्शवली तयारी

मध्यावधी निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले इमिग्रेशन धोरण खूपच कठोर होते, अशी कबुली दिली आहे. आगामी काळात आपण डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इमिग्रेशन धोरण होते कठोर, ट्रम्प यांनी दिली कबुली; 'डेमोक्रॅटिक 'समवेत काम करण्याची दर्शवली तयारी
इमिग्रेशन धोरण होते कठोर, ट्रम्प यांनी दिली कबुली; 'डेमोक्रॅटिक 'समवेत काम करण्याची दर्शवली तयारी
Published on: 

वॉशिंग्टन : मध्यावधी निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले इमिग्रेशन धोरण खूपच कठोर होते, अशी कबुली दिली आहे. आगामी काळात आपण डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले आहे. या निवडणुकीत यांच्या ट्रम्प रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यातील अनेक जागा डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकल्या आहेत. ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण, अर्थव्यवस्था, इराण युद्ध आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी या निकालांमधून दिसून आली. एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी, आपले धोरण खूपच कठोर होते, असे मान्य केले.

भारतीयांना फटका

ही मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी इमिग्रेशनला कडाडून विरोध करणारे स्टीफन मिलर यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प हे आपल्या धोरणात खरोखरच लक्षणीय बदल करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रम्प प्रशासनाने राबवलेल्या या कठोर इमिग्रेशन धोरणाचा सर्वाधिक फटका भारतीय तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना बसला होता. रिपब्लिकन पक्षाच्या दारुण पराभवाची कारणे विचारली असता, ट्रम्प यांनी इराण युद्ध, गॅसचे वाढलेले दर आणि इस्रायलबाबतचा विरोध ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले.

भारत-पाक युद्ध रोखल्याचा दावा

ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणूयुद्ध आपणच रोखले, असा दावा पुन्हा एकदा केला. आपण आठ युद्धे मिटवली असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपण ते थांबवले, असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपण ३ ते ५ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे सांगितल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. मात्र, अमेरिकेने यात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने सातत्याने फेटाळला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)