

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगभरातील विविध देशांवर टॅरिफ लादत गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण केले होते. जगभरातील अर्थव्यवस्था त्यामुळे धोक्यात आल्या होत्या. अशा वेळी अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेत ट्रॅम्प यांनी बाजारातून शेअर्स वारेमाप खरेदी केली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी शेअर बाजार पाडून त्यातून कोट्यवधी रुपये कमवले आहेत. खुद्द अमेरिकेतील नावाजलेल्या सीएनबीसी वृत्तवाहिनीने ट्रॅम्प यांनी केलेली ही फसवणूक विश्लेषण करून जगासमोर आणली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ‘लिबरेशन डे’ टॅरिफमुळे अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते आणि त्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूक वाढवणारे ट्रम्प हेच पहिले गुंतवणूकदार होते. ८ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी ३२७ वेळा शेअर्सची खरेदी केली.
‘मॅग्निफिसेंट सेव्हन’ समूहाचे शेअर्स केले खरेदी
ॲपल, ॲमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हिडिया या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते. हे सर्व शेअर्स ‘मॅग्निफिसेंट सेव्हन’ समूहाचा भाग आहेत, ज्यांना त्यांनीच केलेल्या टॅरिफवाढीच्या घोषणेनंतर मोठा फटका बसला होता. ही खरेदी १,००,००१ डॉलर ते २,५०,००० डॉलर दरम्यान होती.
१२ टक्क्यांची घसरण
८ एप्रिल रोजी अमेरिकन शेअर बाजारातील एस अँड पी ५०० निर्देशांक मंदीच्या बाजाराच्या उंबरठ्यावर येऊन बंद झाला होता. याचा अर्थ त्याच्या उच्चांकावरून त्यात २० टक्क्यांची घसरण झाली होती. २ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीतील केवळ चार सत्रांमध्ये या निर्देशांकात १२ टक्क्यांची घसरण झाली होती.
पदाचा केला दुरुपयोग
ट्रम्प यांचे आर्थिक तपशील समोर आल्यानंतर त्यांनी शेअर बाजार आणि क्रिप्टो बाजारातून नफा मिळवण्यासाठी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा दुरोपयोग केल्याचे समोर आले आहे. यावर ट्रम्प यांना माध्यमांनी जाब विचारल्यावर अमेरिकन शेअर बाजार पडल्याचा फायदा हा सगळ्यांनाच झाला, असे उत्तर त्यांनी दिले.