
न्यू यॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबविल्याचा दावा पुन्हा एकदा केला. इतकेच नव्हे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात एकूण पाच विमाने पाडण्यात आली, असेही ट्रम्प म्हणाले, मात्र ही विमाने कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डेड् उद्धवस्त केले. एकूण नऊ ठिकाणी लष्कराने शत्रूचा अचूक वेध घेतला. अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. या युद्धात भारताची विमाने पाडल्याचा दावा पाकने केला होता. भारताकडून याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आता ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही देशात परिस्थिती अत्यंत गंभीर होती. दोन्ही देशांकडे अणूशक्ती आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात हल्ले करत होते. एकमेकांची विमाने ते लक्ष्य करत होती. मला वाटते ५ विमाने पाडण्यात आली, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता ही विमान कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या दाव्याने वादाला तोंड फुटले आहे.
शांततेचे घेतले क्रेडिट
ट्रम्प यांनी १० मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता करार झाल्याचे त्यांच्या एक्स हँडलवरून जाहीर केले होते. त्याचदिवशी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. आपण व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी तर यूएई आणि अरब देशांच्या मध्यस्थीने तणाव निवाळल्याचे म्हटले होते. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आपल्याचमुळे निवळल्याचा दावा केला आहे.
अनेक युद्ध थांबविली
आम्ही जगात सुरू असलेली अनेक युद्ध थांबवली. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत जात होता. तो दोनच दिवसात वाढला होता. आम्ही हा तणाव व्यापाराद्वारे थांबवला. जर तुम्ही लष्करी सामग्री, शस्त्रांचा अथवा अणू अस्त्रांचा वापर करणार असाल तर आम्ही तुमच्याशी व्यापारी करार करणार नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराण अणू शक्ती कार्यक्रम नष्ट करण्यातही अमेरिकेने मोठी भूमिका निभावल्याचे ते म्हणाले.
... पण पुरावा नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक वेळा हे दावे केले आहेत की त्यांनी भारत-पाक संघर्ष थांबवला. मात्र त्यांच्या दाव्यांना कोणताही अधिकृत पुरावा नाही. भारत सरकारने या दाव्यांवर पुनःपुन्हा स्पष्ट भूमिका मांडली आहे की, कोणतीही मध्यस्थी झाली नाही.
मोदींनी संसदेत निवेदन देण्याची काँग्रेसची मागणी
भारत-पाकिस्तान युद्धात पाच विमाने पाडण्यात आली, असा दावा ट्रम्प यांनी केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असेही गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी पाळलेल्या मौनावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला असून मोदी यांनी या बाबत संसदेत सुस्पष्ट निवेदन द्यावे, अशी मागणी केली आहे.
वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर नव्याने उभ्या राहत असलेल्या 'ब्रीक्स' देशांच्या संघटनेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. 'ब्रीक्स' संघटना वास्तवात संघटित झाल्यास त्यांचे अस्तित्व आम्ही लवकरात लवकर संपवू, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
आम्ही कोणालाही अमेरिकेसोबत खेळायला देणार नाही. ट्रम्प यांनी 'ब्रीक्स' देशांशी संबंध ठेवणाऱ्यांवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकन डॉलर कमकुवत व्हायला देणार नाही
अमेरिकन डॉलरला जागतिक चलनात कमकुवत व्हायला देणार नाही. तसेच केंद्रीय डिजीटल चलन हा विचारही अमेरिकेत लागू व्हायला देणार नाही. मी डिजीटल डॉलर कधीच स्वीकारणार नाही. डिजीटल डॉलर झाल्यास तो अमेरिकेची स्वतंत्र आर्थिक ओळख संपवून टाकेल, असे ते म्हणाले.
'ब्रीक्स' ने आरोप फेटाळले
'ब्रीक्स' ने ट्रम्प यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्या गटाचा उद्देश केवळ विकसनशील देशांना व्यासपीठ देणे आहे. आम्हाला उद्देश अमेरिकेला विरोध करणे नाही.