

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष `डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिल्याबद्दल नॉर्वेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण आतापर्यंत आठ युद्धे मिटविली असून सोडवलेल्या प्रत्येक युद्धासाठी आपल्याला तब्बल आठ वेळा नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. शुक्रवारी सिरॅक्यूस येथील एका रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी, भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध टळल्यामुळे आपण ५० दशलक्ष (पाच कोटी) लोकांचे प्राण वाचवले, असा दावाही केला.
माझ्या रूपाने अमेरिकेची प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड स्टेट्सला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता, पण तो मिळाला नाही. नॉर्वेच्या देशासाठी आणि असा लज्जास्पद व शरमेची संमिश्र भावना निर्माण करणारा निर्णय घेणाऱ्या लोकांसाठी हा एक कायमस्वरूपी कलंक आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे मूल्य आता कायमचे धुळीस मिळाले असून, लोकशाहीविरोधी आणि खरे तर मानवी संस्कृतीचे शत्रू असणाऱ्या काही मूलतत्त्ववादी विचारवंतांनी तो बदनाम केला आहे. नॉर्वे, तुम्ही आम्हाला हा पुरस्कार दिला नाही, हे आम्ही विसरणार नाही, असा इशाराही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.
यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागाच्या माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेच्या नाविक पिल्ले यांना जाहीर झाला आहे. मात्र, "ज्या व्यक्तीबद्दल कोणी कधी ऐकलेही नाही, अशा एका उदारमतवादी व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला आहे," अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली.