

न्यू यॉर्क : अमेरिका लवकरच 'होर्मुझची सामुद्रधुनी' आपल्या ताब्यात घेऊन ती अमेरिकेचा प्रदेश म्हणून घोषित करेल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणचा पराभव अंतिम टप्प्यात असून, लवकरच आपण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला अमेरिकेचा अधिकृत प्रदेश घोषित करू, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. ट्रम्प यांनी दावा केलेला हा तिसरा मोठा आंतरराष्ट्रीय प्रदेश ठरेल.
ट्रम्प यांच्या मते, ही सामुद्रधुनी आधीच एका प्रकारे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आली आहे. सध्या तेथे आमची नाकेबंदी आहे. आम्ही परवानगी दिल्याशिवाय कोणतेही जहाज तेथून जाऊ शकत नाही. आम्ही हे स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या भल्यासाठी करत आहोत, असा दावा त्यांनी केला. याआधी बुधवारी ट्रम्प यांनी 'टूथ सोशल'वर लिहिले होते की, "हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण आहे आणि मला वाटते की आपण ते आपल्याकडेच ठेवू
इराणचे प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबआबादी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. ट्रम्प यांचे दावे म्हणजे केवळ "दिवास्वप्न" असल्याचे सांगत ते म्हणाले, "ही सामुद्रधुनी फक्त इराणच्याच सांगण्यावरून उघडली किंवा बंद केली जाईल. जोपर्यंत अमेरिका आपला पराभव स्वीकारत नाही आणि या काल्पनिक जगात जगणे थांबवत नाही, तोपर्यंत इराण ही नाकेबंदी अशीच सुरू ठेवेल.
व्यावहारिक अडचणी आणि आव्हान
हॉर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेणे ट्रम्प यांच्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत कठीण मानले जात आहे. या सामुद्रधुनीत इराण, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचे प्रादेशिक जलक्षेत्र तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्ग येतात. या भागावर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला ओमान आणि यूएईची संमती घ्यावी लागेल, तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे दुर्लक्ष करून इराणी किनारपट्टीवर लष्करी नियंत्रण मिळवावे लागेल.