वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी निवडणूक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयात शरण आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ॲटलांटातील फुल्टन काऊंटी तुरुंगाची ट्रम्प यांना २० मिनिटे हवा खावी लागली. त्यावेळी अमेरिकेच्या या माजी अध्यक्षांचा कैदी नंबर पीओ ११३५८०९ असा होता. अमेरिकेच्या आजी किंवा माजी अध्यक्षांना अशा प्रकारे कैद होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेत २०२० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना पराभूत करून जोसेफ बायडेन निवडून आले. त्यावेळी जॉर्जिया या राज्यातील मतदान अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. त्याने निवडणुकीचे पारडे ट्रम्प यांच्या विरोधात फिरवले. त्यानंतर ट्रम्प यांनी हा निकाल अमान्य करत मोठा थयथयाट केला होता. ट्रम्प आणि अन्य १८ जणांवर जॉर्जिया राज्यातील मतदानाचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवत शिक्षा दिली. ट्रम्प यांनी न्यायालयात उपस्थित राहत आरोप स्वीकारले. त्यानंतर त्यांची रवानगी अॅटलांटातील फुल्टन काऊंटी तुरुंगात झाली. तेथे ट्रम्प यांनी २० मिनिटे कैद भोगली. त्यानंतर ट्रम्प अॅटलांटातील हार्ट्सफिल्ड जॅक्सन विमानतळावरून स्वत:च्या खासगी विमानातून न्यूजर्सीतील गोल्फ क्लबवर गेले.
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही
अमेरिकेच्या इतिहासात एखाद्या प्रकरणी कैद भोगावी लागणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष आहेत. यापूर्वी एकाही आजी किंवा माजी अध्यक्षावर ही वेळ आली नव्हती. इतकी मानहानी होऊनही डोनाल्ड ट्रम्प यांचा तोरा काही कमी झाला नव्हता. त्यांनी न्यायालयीन कारवाईदरम्यानचा स्वत:चा फोटो काढून तो ट्रुथ सोशल नावाच्या आपल्याच खासगी इंटरनेट प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला. त्याखाली इलेक्शन इंटरफरन्स, नेव्हर सरेंडर अशा शब्दांत प्रतिक्रियाही लिहिली. अटकेविषयी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, आजचा दिवस अमेरिकेसाठी अत्यंत दु:खद आहे. आज येथे जे जे घडले आहे ती न्यायाची थट्टा आहे. मी काहीही चूक केलेली नाही. ट्रम्प यांचे हे वर्तन सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, या म्हणीला साजेसेच होते.