ट्रम्प यांची आता अर्जेंटिनाला धमकी; झेवियर मिलेई निवडणूक हरल्यास आर्थिक रसद बंद करण्याचा दिला इशारा

भारत, चीन आणि रशियाला टॅरिफच्या मुद्द्यांवरून धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा अर्जेंटिनाकडे वळविला आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे निवडणूक हरल्यास आम्ही अर्जेंटिनाची आर्थिक रसद बंद करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : भारत, चीन आणि रशियाला टॅरिफच्या मुद्द्यांवरून धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा अर्जेंटिनाकडे वळविला आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे निवडणूक हरल्यास आम्ही अर्जेंटिनाची आर्थिक रसद बंद करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी २० अब्ज डॉलर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जर एखादा नेता मध्यावधी निवडणुका जिंकू शकला नाही तर आम्ही उदार होणार नाही, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी अर्जेंटिनाला सुनावले असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. ट्रम्प म्हणाले की, मी या माणसाबरोबर आहे कारण ते हुशार आहेत. ते निवडणूक जिंकू शकतात, ते निवडणूक का जिंकू शकत नाहीत, मला वाटते की ते निवडणूक जिंकतील. ते जिंकले तर आपण त्यांच्याबरोबर असू, असेही ते म्हणाले.

बाजारपेठा अस्थिर

अर्जेंटिनाच्या अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने तब्बल २० अब्ज डॉलर देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, यावेळी ट्रम्प यांनी मिलेई यांचे कौतुक महान नेता असेही केले. ट्रम्प म्हणाले की, ते निवडणुकीत त्यांच्या वैचारिक सहयोगीला पूर्णपणे समर्थन देतील. अमेरिकेला काय फायदा झाला, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले की, आम्ही एका महान व्यक्तीला देशावर सत्ता मिळवण्यास मदत करत आहोत. आम्हाला ते यशस्वी झालेले पाहायचे आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी वारंवार मिलेई यांना राजकीय पाठिंबा दिला आहे, मात्र, सध्याच्या परिस्थितीत अर्जेंटिनाच्या बाजारपेठा अजूनही अस्थिर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in