"जे देश आमचे नुकसान करतात..."; भारत, चीनवर जास्त अधिभार लावण्याची ट्रम्प यांची धमकी

भारत, चीन व ब्राझील आदी देशांवर जास्त अधिभार लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : भारत, चीन व ब्राझील आदी देशांवर जास्त अधिभार लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

जे देश आमचे नुकसान करतात त्यांच्यावर अधिक कर लावणार आहोत. चीन जास्त कर लावतो. भारत, ब्राझील आदी देशही असेच करतात. आता आम्ही हे सहन करणार नाही. कारण आम्ही अमेरिकेला सर्वात पहिल्या स्थानावर ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

भारत, चीन, ब्राझील हे तीन देश आपल्या स्वत:च्या हितासाठी काम करतात. त्यामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. अमेरिका एक अशी यंत्रणा तयार करेल, ज्यामुळे आमच्या देशाच्या खजिन्यात पैसे येतील आणि अमेरिका पुन्हा श्रीमंत बनेल. या सर्व बाबी लवकरच घडणार आहेत, असे ट्रम्प यांनी ठणकावले.

अमेरिकन नागरिकांना श्रीमंत बनवणार

दुसऱ्या देशांना श्रीमंत बनवण्यासाठी आपल्याच नागरिकांना कर लावण्याऐवजी आम्ही अमेरिकन नागरिकांना श्रीमंत बनवण्यासाठी दुसऱ्या देशांवर कर लावणार आहोत. परदेशी कंपन्यांना मोठ्या करांपासून वाचायचे असल्यास त्यांना अमेरिकेत आपले कारखाने स्थापन करावे लागतील. जेव्हा अन्य देशांवर कर वाढतील, तेव्हाच अमेरिकन कामगार व उद्योगांवरील कर कमी होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन कारखाने वाढतील, असे ते म्हणाले.

अवैध नागरिकांबाबत मोदी योग्य पावले उचलतील - ट्रम्प

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अवैध नागरिकांबाबत चर्चा झाली. बेकायदेशीर नागरिकांबाबत पंतप्रधान मोदी हे योग्य ती पावले उचलतील, असे ट्रम्प यांनी सांगितले. याबाबत भारतासोबत चर्चा सुरू आहे. येत्या फेब्रुवारीत मोदी हे अमेरिकेच्या भेटीवर येण्याची शक्यता आहे. मोदी हे अवैध प्रवाशांना मायदेशी बोलावण्यास सहमत आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारला असता ते म्हणाले की, जे योग्य असेल ते मोदी करतील. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत. मोदींसोबत अनेक विषयांवर आमची चर्चा झाली, असे ट्रम्प म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in