ट्रम्प यांची ग्रीनलॅण्ड विकत घेण्याची इच्छा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कचा ताबा असलेला ग्रीनलॅण्ड विकत घेण्याची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएफपी
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कचा ताबा असलेला ग्रीनलॅण्ड विकत घेण्याची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून अलास्का मिळविले होते. ट्रम्प यांनी यापूर्वीही २०१९ मध्ये ग्रीनलॅण्ड घेण्याचे प्रयत्न केले होते. अलास्का आणि ग्रीनलँड, या दोन्ही ठिकाणी थंड हवामान, कमी लोकसंख्या, मोक्याची ठिकाणे आणि तेलाचे साठे असून ५८६,४१२ चौरस मैल असलेल्या अलास्काची किंमत तेव्हा ७.२ दशलक्ष डॉलर होती, जी आज अंदाजे १५३.५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. माध्यमांच्या माहितीनुसार ८,३६,००० चौरस मैलांमध्ये पसरलेल्या ग्रीनलँडची किंमत २३०.२५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. अमेरिकेने १९१७ मध्ये डेन्मार्ककडून यूएस व्हर्जिन बेट २५ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले होते. तर, १८०३ मध्ये फ्रान्सकडून लुईझियाना १५ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी करण्यात आले होते.ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचे स्वारस्य असण्याची अनेक कारणे आहेत. हे बेट उत्तर अमेरिका ते युरोप या सर्वात लहान मार्गावर आहे. यात दुर्मिळ खनिजांचा सर्वात मोठा साठा आहे. ही खनिजे बॅटरी आणि उच्च-तंत्रज्ञान उपकरणांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. याच कारणांमुळे अमेरिकेला ग्रीनलँडचा ताबा हवा आहे.

ट्रम्प २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी ग्रीनलँडला अमेरिकेला जोडण्यासाठी डेन्मार्कविरूद्ध लष्करी किंवा आर्थिक उपाययोजना वापरण्याची शक्यता व्यक्त केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल सर्वत्र दिसणाऱ्या चीनच्या आणि रशियाच्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ही बेटे महत्त्वाची आहेत. आर्थिक सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँडची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

केवळ ५७ हजार लोकसंख्या असलेला ग्रीनलँड ६०० वर्षांपासून डेन्मार्कचा भाग आहे. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी डॅनिश टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ग्रीनलँड तेथील स्थानिक लोकांचा आहे आणि केवळ तेच त्याचे भविष्य ठरवू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in