

वॉशिंग्टन : लवकरच एक वादळ येणार आहे आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा मजकूर असलेले एक छायाचित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने ही इराणला दिलेली धमकी आहे असा त्याचा अर्थ लावला जात आहे.
ट्रम्प यांनी हे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटणार असल्याचे आणि अमेरिका इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिका इराणच्या ऊर्जा केंद्रांवर आणि महत्त्वाच्या पुलांवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे, असा या पस्टचा अर्थ लावला जात आहे. अमेरिकेच्या नौदलाने यापूर्वीच पर्शियन गल्पमध्ये मोठी फौज तैनात केली आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे केवळ इराणच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेतील घडामोढींकडे लागले आहे.
दरम्यान, इस्लामिक प्रजासत्ताक इराण आपल्या 'अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेचे' राष्ट्रीय संपत्ती म्हणून रक्षण करेल, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मुजतबा खामेनी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. इराणचे सर्वोच्च नेते म्हणून पदभार स्वीकारल्यापासून आपल्या सर्व निवेदनांप्रमाणेच, अयातुल्ला मुजतबा खामेनी यांनी गुरुवारी एका लेखी निवेदनातून (जे सरकारी टीव्ही अँकरद्वारे वाचून दाखवण्यात आले) कठोर भूमिका घेतली. त्यांनी आक्रमक सूर लावत म्हटले की, पर्शियन आखातात अमेरिकेचे एकमेव योग्य ठिकाण "त्यांच्या पाण्याच्या तळाशी" आहे. तसेच, त्यांनी दावा केला की या प्रदेशाच्या इतिहासात एक "नवीन अध्याय" लिहिला जात आहे. दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने लादलेली कोणतीही नौदल नाकेबंदी अयशस्वी ठरेल, बुधवारी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये इराणच्या संवर्धित युरेनियमची हाताळणी करण्यासाठी रशियाने 'तिसरा देश' म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडे असलेले सुमारे ९७० पौंड संवर्धित युरेनियम रशियाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. पुतिन यांनी या प्रक्रियेत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांना युरेनियम संवर्धन प्रक्रियेत सहभागी व्हायला आवडेल, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.
पुन्हा संघर्ष नको- पुतीनचा इशारा
इराणसोबतच्या संभाव्य अणु कराराच्या संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. दुसरीकडे, इराणविरुद्ध पुन्हा लष्करी संघर्ष सुरू झाल्यास त्याचे 'गंभीर परिणाम' होतील, असा इशारा रशियाने दिला आहे.