ट्रम्प भडकले! जा, तुमचे तेल तुम्हीच मिळवा; ब्रिटन, फ्रान्सला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी ब्रिटन व फ्रान्सवर भडकले. इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यात सहभागी न झालेल्या या देशांना कडक शब्दांत सुनावले आहे.
ट्रम्प भडकले! जा, तुमचे तेल तुम्हीच मिळवा; ब्रिटन, फ्रान्सला इशारा
ट्रम्प भडकले! जा, तुमचे तेल तुम्हीच मिळवा; ब्रिटन, फ्रान्सला इशारा
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी ब्रिटन व फ्रान्सवर भडकले. इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यात सहभागी न झालेल्या या देशांना कडक शब्दांत सुनावले आहे. होर्मुझमध्ये जा आणि तुम्ही स्वतःचे तेल स्वतः मिळवा असा संतप्त सल्ला त्यांनी या देशांना दिला आहे.

होर्मुझचे आखात उघडणे हे अमेरिकेच्या दृष्टीने प्राधान्याचे नाही असे नमूद करून ट्रम्प यांनी युध्द गुंडाळण्याचे संकेत दिल्याचे वृत्तही काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या देशांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील वादामुळे जेट इंधन मिळत नाहीये, विशेषतः ब्रिटनसारखे देश ज्यांनी इराणविरुद्धच्या कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला, त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी प्रथम अमेरिकेकडून तेल खरेदी करावे आणि दुसरे म्हणजे, थोडे धाडस दाखवून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपले तेल स्वतः मिळवावे.

दरम्यान,   आता अमेरिकेला या संघर्षाची झळ बसू लागली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इराण - अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धाचा परिणाम जगातील असंख्य देशांवर झालेला दिसत आहे. युद्धाचा परिणाम अमेरिकेवरही झालेला दिसत आहे. अमेरिकेत गॅसोलीन ( पेट्रोल ) महाग झाले आहे. २०२२ नंतर याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर दरांमध्ये मोठी वाढ होत आहे.

गॅसोलिनच्या एक गॅलनची सरासरी किंमत ४.०२ डॉलरवर पोहचली आहे. इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी हा दर १ डॉलर प्रति गॅलन इतकी होती. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये यापेक्षाही जास्त दर गाठले आहेत. अमेरिकेतील डिझेल दरांचा विचार केल्यास,सरासरी दर ५.४५ डॉलर प्रति गॅलन आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी हे दर ३.१६ प्रति गॅलन इतके होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युद्ध अजून काही दिवस सुरू राहिले तर तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. या अगोदर २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाकडून हल्ला करण्यात आला होता, त्यावेळी तेलाचे दर प्रचंड वाढले होते.

इराणच्या शस्त्रागारावर अमेरिकेचा हल्ला

अमेरिकेने इराणमधील इस्फहान शहरातील एका मोठ्या शस्त्रागारावर हवाई हल्ला केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, हा हल्ला सोमवारी रात्री २,००० पौंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करून करण्यात आला. एका अमेरिकी अधिकाऱ्याचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि लष्करी उपकरणे असलेल्या डेपोला लक्ष्य करण्यात आले होते. बंकर-बस्टर बॉम्बचा वापर तटबंदीयुक्त आणि भूमिगत लक्ष्ये नष्ट करण्यासाठी केला जातो. डेपोमध्ये साठवलेल्या शस्त्रास्त्रांचा स्फोट झाल्याने या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी स्फोट झाले आणि मोठ्या प्रमाणात आग लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या स्फोटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

युद्धाची निम्म्याहून अधिक उद्दिष्टे साध्य : नेतान्याहू

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा व ऊर्जा पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, इराणसोबत सुरू असलेले युद्ध कधी संपेल हे माहीत नाही. याची कालमर्यादा निश्चित करता येत नाही. न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असा दावा केला की, युद्धाची निम्म्याहून अधिक उद्दिष्टे साध्य झाली आहेत. त्यांनी असेही म्हटले की, इराणची सध्याची राजवट अखेरीस कमकुवत होईल.

ट्रम्प यांची लोकप्रियता खूपच घटली; मानांकन उणे १७ पर्यंत घसरले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता सातत्याने घटत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांचे निव्वळ पसंती रेटिंग (नेट अप्रूव्हल रेटिंग) -१७ पर्यंत घसरले असून,त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही सर्वात खालची पातळी आहे. एका अहवालानुसार, ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला चांगला पाठिंबा मिळाला होता, परंतु कालांतराने त्यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली. इतिहासाच्या तुलनेत, कोणत्याही विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इतके कमी रेटिंग मिळालेले नाही. ट्रम्प यांची लोकप्रियता तर जो बायडेन, जिमी कार्टर आणि रोनाल्ड रेगन यांसारख्या माजी राष्ट्राध्यक्षांपेक्षाही कमी आहे.

अलीकडेच २६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणानुसार, केवळ ४१% लोक ट्रम्प यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत, तर ५९% लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. हा आकडा त्यांच्या दोन्ही कार्यकाळांतील नाराजीची सर्वोच्च पातळी दर्शवतो.

पक्षीय पातळीवरही पाठिंबा कमी झाला आहे. रिपब्लिकन समर्थकांमध्ये, त्यांचा पाठिंबा गेल्या वर्षी मार्चमधील ९२% वरून घसरून ८४% झाला आहे. दरम्यान, डेमोक्रॅटिक समर्थकांपैकी ९५% लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे.

आक्रमकांचे पाय कापू; इराणी सैन्याचा इशारा

इराण-इस्रायल संघर्षात आता मोठी ठिणगी पडली आहे. अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास आक्रमकांचे पाय कापू, असा थेट इशारा इराणी सैन्याने दिला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. यादरम्यान अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याची शक्यता निर्माण झालेली आहेच. यादरम्यान इराणने देशावर आक्रमण करणाऱ्यांचे पाय कापून टाकले जातील, असा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in