चर्चा निष्फळ झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक करू; ट्रम्पचा नवा इशारा; इराणने मात्र ट्रम्पचा दावा फेटाळला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. इराणसोबत चर्चा निष्फळ झाली तर त्या देशावर बॉम्बफेक करू असे मंगळवारी त्यांनी स्पष्ट केले.
चर्चा निष्फळ झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक करू; ट्रम्पचा नवा इशारा; इराणने मात्र ट्रम्पचा दावा फेटाळला
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टनः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. इराणसोबत चर्चा निष्फळ झाली तर त्या देशावर बॉम्बफेक करू असे मंगळवारी त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या उर्जा प्रकल्पांवर पुढचे पाच दिवस हल्ले केले जाणार नाहीत असे सांगून युध्दात अल्पविराम जाहीर केला होता. इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, आपल्याच घोषणेला काही तास उलटत नाही तोच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे.  

इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणसोबत १५ कलमी करार होऊ शकतो, त्यांच्या काही नेत्यांशी बोलणी चालू आहेत असे ट्रम्प यांनी काल सूचित केले होते. आज मात्र त्यांनी या कराराचा उल्लेख टाळला. इराणने अण्वस्त्रे न बाळगण्यास सहमती दर्शवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, ट्रम्प नेमक्या कोणत्या इराणी नेत्याशी बोलत आहेत, ते नाव मात्र त्यांनी उघड केलेले नाही. आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत, ज्याला मी सर्वात आदरणीय आणि खरा नेता मानतो. ते सर्वोच्च नेते नाहीत. त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेले नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मोजतबा खोमेमी यांच्याबद्दल ते म्हणाले की, ते जिवंत आहेत की नाही हेदेखील आम्हाला माहीत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा जो दावा केला होता, तो इराणने केवळ फेटाळलाच नाही, तर त्याला ‘फेक न्यूज’ ठरवलं आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘आयआरआयबी’ने ट्रम्प यांच्या विधानाला ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन्स’ म्हणजेच मानसिक युद्धनीती म्हटलंय. इतकंच नाही, तर इराणने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत ७७ वेव्ह मिसाईलचा मारा केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in