

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना ५ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ४३ कोटी रुपये भरून अमेरिकेचे ‘गोल्ड कार्ड’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ‘ग्रीन कार्ड’ची जागा आता ‘गोल्ड कार्ड’ घेणार आहे. ओव्हल कार्यालयात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
ट्रम्प यांनी 'गोल्ड कार्ड' हे ‘ईबी-५’ व्हिसा कार्यक्रमाला पर्याय असल्याचे म्हटले आहे आणि भविष्यात १ दशलक्ष ‘गोल्ड कार्ड’ विकले जातील, असे सांगितले. सध्या, ‘ईबी-५’ व्हिसा कार्यक्रम हा अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी लोकांना सध्या १० लाख डॉलर्स (सुमारे ८.७५ कोटी रुपये) द्यावे लागतात.
रशियन नागरिकांनाही ‘गोल्ड कार्ड’ देणार का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हो, रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. किमान एक दशलक्ष लोकांना ‘गोल्ड कार्ड’ दिले जाऊ शकते, अशी शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे.
‘ईबी-५’ योजना काय?
आधीच्या ‘ईबी-५’ योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यवसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. १० लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ‘ग्रीन कार्ड’ योजनेत द्यावे लागत होते. श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास अमेरिकेच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल, ते अधिक यशस्वी होतील, त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवेल यात शंका नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ग्रीन कार्डला पर्याय
यापूर्वीच्या ईबी-५ (ग्रीन कार्ड) योजनेची जागा आता ‘गोल्ड कार्ड’ घेणार आहे. या माध्यमातून ‘गोल्ड कार्ड’ घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. ‘गोल्ड कार्ड’च्या माध्यमातून ‘ग्रीन कार्ड’प्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यात जाहीर करू, असेही ते म्हणाले.