
वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली. अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे जज जॉन रॉबर्ट यांनी ट्रम्प यांना शपथ दिली. दरम्यान, अमेरिकेच्या जे. डी. वेन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. यापूर्वी ट्रम्प हे २०१७ ते २०२१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते.
कॅपिटॉल हिल येथे झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह जगभरातील नामवंत उपस्थित होते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मावळते अध्यक्ष ज्यो बायडन, माजी अध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे जज, ट्रम्प यांचे कुटुंबीय, भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, ट्रम्प हे पहिल्याच दिवशी १०० हून अधिक कार्यकारी आदेश जारी करण्याची दाट शक्यता आहे.