बीजिंग : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला चीन लोकसंख्येशी संबंधित अनेक समस्यांशी झुंजत आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून जन्मदर घटत आहे. आता चीनवर आणखी एक संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे मुलांना लग्नासाठी मुली न मिळण्याचे. चीनमधील ३.५ कोटी पुरुषांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत. कारण पुरुषांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे भविष्यात चीनच्या लोकसंख्येसमोर मोठे संकट उभे राहणार आहे.
जगात चीनची लोकसंख्या सर्वाधिक होती. पण, चिनी अर्थव्यवस्था वाढू लागल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल झाले. महागाई वाढू लागल्याने तरुण-तरुणी विवाह टाळू लागले आहेत. चीनने लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘एक कुटुंब-एक मूल’ धोरण १९७५ पासून सुरू केले. त्यामुळे देशात लैंगिक असमानता निर्माण झाली. २०२० मध्ये चीनच्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, देशातील महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सध्या ३.४ कोटी अधिक आहे.
‘इन्स्टिट्यूट फॉर चायना रुरल स्टडीज्’च्या अहवालानुसार, ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण बनले आहे. पारंपरिक विवाहाला मान्यता मिळत नाही. त्यामुळे आधुनिक लग्न करताना खर्च वाढत आहेत. तो खर्च अनेकांना झेपत नाही.
विवाहासाठी रशियन महिलांचा शोध
लैंगिक असमानता वाढत असल्याने काही व्यावसायिक लग्न जुळवणाऱ्या कंपन्यांनी चिनी पुरुषांसाठी रशियन महिला शोधण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये रशियन मुलींशी लग्न करण्याचा प्रघात वाढू लागला आहे. विशेष म्हणजे रशियात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय विवाहाला प्रोत्साहन देण्याची सूचना
चीनच्या प्रा. डिंग चांगफा यांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय विवाह वाढवण्याची सूचना केली आहे. तरुणांनी रशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, पाकिस्तान देशातून वधू आणावी. चीनच्या ग्रामीण भागात ३.५ कोटी पुरुष राहतात. या पुरुषांना लग्नाच्या वधूसाठी घर, कार व ५ ते ६ लाख युआन देण्याचा दबाव असतो. चीनच्या जियामेन विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसरनीही आंतरराष्ट्रीय विवाह करावेत, अशी सूचना केली. मात्र, त्याच्या सूचनेला चीनमधून मोठा विरोध होत आहे.