
इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ताला भूकंपाचा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 5.6 इतकी असल्याचे वृत्त आहे. ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 300 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे.
राजधानी जकार्ता पासून सुमारे 75 किमी पश्चिमेला सियानजूर हे भूकंपाचे केंद्र होते. 5.6 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात सुमारे 10 किमी होता. यामध्ये ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 300 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हरमन सुहरमन यांनी दिली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचे नुकसान झाले आहे. सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेतली जात आहे.