
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये शनिवारी दुपारी एकच्या सुमारास भूकंपाचे दोन तीव्र धक्के बसले. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे उत्तर पाकिस्तानमधील अनेक शहरे हादरली. या अनेक भागात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के काश्मीर खोऱ्यातही जाणवल्याचे वृत्त आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, पेशावर, मरदान, मोहमंद, स्वाबी, नौशेरा, लक्की मारवत, लोअर दिर, मलाकंद आणि शबकदर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, कोणत्याही भागातून जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. दुपारी १२.३० वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. यानंतर ३० मिनिटांनी दुसरा सर्वात मोठा भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी नोंदविली गेली. या भूकंपाचे केंद्र रावळपिंडीपासून ६० किलोमीटर अंतरावर होते, ज्याची खोली फक्त १२ किलोमीटर इतकी कमी होती, असे वृत्त पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिले आहे.
राष्ट्रीय भूकंप निरीक्षण केंद्र (एनएसएमसी), पीएमडी इस्लामाबादनुसार, भूकंप दुपारी १२.३१ वाजता झाला, त्याची तीव्रता ५.५ आणि खोली १२ किलोमीटर होती. भूकंपाचे केंद्र रावळपिंडीच्या वायव्येस ६० किलोमीटर अंतरावर, अक्षांश ३३.९० उत्तर आणि रेखांश ७२.६६ पूर्व येथे होते.
२ एप्रिल रोजीही भूकंपाचे धक्के
याआधी २ एप्रिल रोजी पहाटे २.५८ वाजता पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ होती. अलीकडेच म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपाचा मोठा तडाखा बसला आहे.