
बीजिंग : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी सोमवारी बीजिंग येथे भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांत निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी त्यातून प्रयत्न केले गेले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन हे गेले दोन दिवस चीनच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. तत्पूर्वी ब्लिंकेन यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या भेटीत स्पष्ट आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे अमेरिकी परराष्ट्र खात्याने जाहीर केले.
गेल्या काही वर्षांत चीन आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. कोरोना महासाथ, तैवानचा प्रश्न, तंत्रज्ञान चोरी प्रकरण, अमेरिकी अवकाशात चिनी हेरगिरी बलून पाडण्याचे प्रकरण आदी कारणांनी हा तणाव वाढीला लागला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान अध्यक्ष बायडेन यांनी चीन हा अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला असलेला सर्वांत मोठा धोका आहे, असे म्हटल्याने त्यात भरच पडली होती. त्या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.
आगामी जागतिक सत्ताव्यवस्थेत चीन आणि अमेरिका यांनी शत्रुत्वाची भावना बाळगण्यापेक्षा सहकार्याचे धोरण स्वीकारावे, असे मत वांग यी यांनी व्यक्त केले, तर दोन्ही देशांनी स्पर्धेचे नीट व्यवस्थापन करावे आणि त्यातून संघर्ष उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत ब्लिंकेन यांनी व्यक्त केले. या भेटीतून चीन-अमेरिका संबंधांत निर्णायक बदल जरी होणार नसले तरी वाटाघाटींचे दरवाजे उघडे राहतील, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय निरीक्षक बाळगून आहेत.