इजिप्तमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान- विद्यमान अध्यक्ष अल-सिसी यांच्या फेरनिवडीची शक्यता

अधिकृत आकडेवारीनुसार इजिप्तची लोकसंख्या १०५ दशलक्ष असून त्यातील जवळपास एक तृतीयांश लोक गरिबीत राहतात.
इजिप्तमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान- विद्यमान अध्यक्ष अल-सिसी यांच्या फेरनिवडीची शक्यता

कैरो : इजिप्तमध्ये रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान सुरू झाले. ही प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. विद्यमान अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी पुन्हा निवडून येण्यासाठी उत्सुक असून त्यांना सध्या कोणात्याही उमेदवाराकडून गंभीर आव्हान नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत यशस्वी झाल्यास अल-सिसी यांचा हा अध्यक्षपदाचा तिसरा कालावधी असेल.

एल-सिसी यांच्यासमोर इतर तीन उमेदवार आहेत. त्यात विरोधी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख फरीद झहरान, वफ्द पार्टीचे अध्यक्ष अब्देल-सनद यामामा आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे प्रमुख हाझेम उमर यांचा समावेश आहे. रविवारपासून सुरू होऊन मतदान तीन दिवस चालेल. जर कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळाले नाही तर रन-ऑफ घेतले जाईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हजारो सैनिक आणि पोलीस तैनात केले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार इजिप्तची लोकसंख्या १०५ दशलक्ष असून त्यातील जवळपास एक तृतीयांश लोक गरिबीत राहतात. त्यापैकी ६७ दशलक्षाहून अधिक लोक मतदान करण्यास पात्र आहेत. गाझामधील इस्रायल-हमास युद्धामुळे निवडणुकीला अपेक्षित महत्त्व मिळाल्याचे दिसत नाही. बहुतांश इजिप्शियन लोकांचे लक्ष त्यांच्या देशाच्या पूर्वेकडील सीमेवरील युद्धाकडे आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या त्रासाकडे आहे. अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन, कोरोनाची साथ, युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आदी घटनांचा फटका इजिप्तच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. रशियन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. त्यामुळे नागरिकांत मतदानासाठी पुरेसा उत्साह दिसत नाही.

logo
marathi.freepressjournal.in