ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला

‘एल मेंचो’ ठार झाल्याचे समजताच काही तासांतच बंदुकधाऱ्यांनी जालिस्कोमध्ये वाहनांची जाळपोळ केली. २० हून अधिक रस्ते जळत्या वाहनांनी अडवले. अनेक ठिकाणी औषध दुकाने, किराणा स्टोअर्सना आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘एल मेंचो’चा अंत हा मेक्सिकोतील संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी...
ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला
ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला
Published on

मेक्सिकोतील सर्वाधिक वाँटेड ड्रग माफिया नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हांतेस उर्फ ‘एल मेंचो’ रविवारी लष्करी कारवाईत ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर देशातील अनेक राज्यांत हिंसाचार उसळला आहे. वाहनांना आग लावणे, महामार्ग रोखणे, सुरक्षा दलांशी चकमकी अशा घटनांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून अमेरिका, कॅनडा आणि भारतानेही नागरिकांसाठी सुरक्षा सल्ले जारी केले आहेत.

मेक्सिकोच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जालिस्को राज्यातील तापाल्पा येथे लष्कराच्या हाय-प्रोफाइल ऑपरेशनमध्ये ६० वर्षीय ‘एल मेंचो’ याचा गंभीर जखमी झाल्यानंतर मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कडक सुरक्षा बंदोबस्तात मेक्सिको सिटीमध्ये नेण्यात आला. तो 'जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल' (CJNG) या मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली ड्रग कार्टेल आणि खतरनाक गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख होता.

तापाल्पामध्ये काय घडले?

मेक्सिकोच्या राष्ट्रीय संरक्षण सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध सुरक्षा दलांनी पश्चिम जालिस्कोतील तापाल्पा येथे संयुक्त कारवाई केली. चकमकीदरम्यान सहा संशयित कार्टेल सदस्य ठार झाले, तर तीन सैनिक जखमी झाले असून त्यांना राजधानीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत रॉकेट लाँचर्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. विमान पाडण्यास आणि बख्तरबंद वाहनांचा नाश करण्यास सक्षम अशी शस्त्रेही सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेने ओसेगुएराच्या अटकेसाठी १५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प प्रशासनाने CJNGला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते.

पाच राज्यांत हिंसाचार, महामार्गांवर प्रवास टाळण्याचा सल्ला

‘एल मेंचो’ ठार झाल्याचे समजताच काही तासांतच बंदुकधाऱ्यांनी जालिस्कोमध्ये वाहनांची जाळपोळ केली. २० हून अधिक रस्ते जळत्या वाहनांनी अडवले. ग्वाडालाहारा आणि पर्यटकांचे प्रमुख केंद्र 'पुएर्तो वलार्ता' येथेही तणाव पसरला. मिचोआकान आणि ग्वानाजुआतोसह किमान पाच राज्यांत हिंसाचार पसरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्वानाजुआतोमध्ये औषध दुकाने आणि किराणा स्टोअर्सना आग लावण्यात आल्याची माहिती राज्याच्या सुरक्षा विभागाने दिली. “जखमींची नोंद नाही; मात्र मालमत्तेचे नुकसान झाले आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कर, नॅशनल गार्ड आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहेत. जालिस्कोच्या राज्यपालांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. महामार्गांवर प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

अमेरिका-कॅनडातील अनेक उड्डाणे रद्द, क्रीडा स्पर्धांनाही फटका

सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २०२६ च्या विश्वचषकातील चार सामने जालिस्कोमध्ये होणार आहेत, त्यामुळे येथे मोठ्या जमावांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक लिगचे अनेक फुटबॉल सामनेही पुढे ढकलण्यात आले आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि कॅनडातील विमान कंपन्यांनी मेक्सिकोसाठी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. एअर कॅनडाने पुएर्तो वलार्ता येथील उड्डाणे स्थगित केली आहेत.

ट्रम्प यांच्या वाढत्या दबावामुळे कारवाई?

अमेरिकेचे उपपरराष्ट्र सचिव ख्रिस्तोफर लँडाऊ यांनी या कारवाईचे स्वागत करत ओसेगुएराला “रक्तपिपासू आणि निर्दयी ड्रग किंगपिन” असे संबोधले. मेक्सिको, अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि जगासाठी ही चांगली बातमी असल्याचं ते म्हणाले.

अमेरिकेत ड्रग्जचा, विशेषतः फेंटानिलची तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर दबाव वाढवलेला असताना ‘एल मेन्चो’ आणि त्याच्या कार्टेलवर ही कारवाई झाली आहे. ट्रम्प वारंवार मेक्सिकोने तस्करी रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत असा आरोप करत निर्यातीवर कर लावण्याची धमकी देत होते. २०२२ मध्ये अमेरिकन न्याय विभागाने ओसेगुएराविरोधात फेंटानिल निर्मिती आणि वितरणाचे आरोप दाखल केले होते.

घरातच थांबा, सतर्क राहा; भारतीय नागरिकांसाठी सल्ला

मेक्सिकोतील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जालिस्को (पुएर्तो वलार्ता, चापाला, ग्वादालाहारा), तमाउलिपास (रेनोसा), मिचोआकान, गुएरेरो आणि नुएवो लेओन राज्यांतील भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी अथवा घरातच थांबावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दूतावासाने नागरिकांना कारवाई सुरू असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे, अनावश्यक हालचाली टाळण्याचे, स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत ९११ वर संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. मदतीसाठी +५२ ५५ ४८४७ ७५३९ या क्रमांकावर भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

‘एल मेंचो’चा अंत हा मेक्सिकोतील संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे कार्टेलची ताकद आणि प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलांनी प्रभावित भागांत मोठ्या प्रमाणावर तैनाती केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in