
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या उद्योजक एलॉन मस्क यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्रम्पविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माफी मागितली आहे.
“गेल्या आठवड्यात मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल शेअर केलेल्या ‘पोस्ट’बद्दल मला खंत आहे, आम्ही खूप पुढे गेलो होतो. आमचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील काही ‘पोस्ट’बद्दल मला पश्चात्ताप होत आहे,” अशी खंत मस्क यांनी व्यक्त केली आहे.
तसेच सेक्स रॅकेटशी संबंध असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव असल्याचा दावाही मस्क यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा दिला. यानंतर ट्रम्प यांनीदेखील मस्क यांच्यावर निशाणा साधला होता. मस्क यांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान आणि सरकारी करार रद्द करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती.
‘वन बिग ब्युटीफुल’ धोरणामुळे मतभेद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. परंतु आता एलॉन मस्क यांनी माघार घेतल्याचे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्युटीफुल’ धोरणावर मस्क यांनी टीका केली होती. यानंतर हा वाद सुरू झाला होता. ट्रम्प माझ्याशिवाय निवडणूक जिंकू शकले नसते, असेही मस्क यांनी म्हटले होते.